बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर आता हे प्रकरण चांगलंच पेटलं आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ता हिने आरोप केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांची नावे समोर आली आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरही आता एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. बॉलिवूडमधील संस्कारी बाबू अलोक नाथ, रजत कपूर, कैलाश खेर, विकास बहल यांच्यानंतर सुभाष घई यांच्यावरील आरोपामुळे या यादीत भर पडली आहे.
एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सुभाष घई यांनी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान ड्रग्ज घेऊन आपल्यावर बलात्कार केला असल्याचं तिने म्हटलं आहे.
“सुरुवातीला ते मला गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी घेऊन जात असत. इतकंच नाही तर या ठिकाणी इतर पुरुष सहकाऱ्यांबरोबर रात्री उशीरापर्यंत बसवून ठेवत असत. मग काही वेळेस ते मला घरी सोडविण्यासाठी येत. तेव्हा ते माझ्या मांडीवर हात ठेवत असत. त्यानंतर मी चांगलं काम केल्याबद्दल ते मला बराच वेळ मिठीही मारत असत. त्यांच्या लोखंडवाला येथील घरी त्यांचे कुटुंबिय राहत नसत, त्यामुळे चित्रपटाच्या संहितेचे वाचन करण्यासाठी ते या घरी मला बोलवत. त्यावेळीही ते माझ्याशी अतिशय असभ्य वर्तन करायचे.” असं या महिलेने म्हटलं आहे.
या महिलेने घई यांनी आपल्याशी कशाप्रकारे लगट करण्यास सुरुवात केली हेही सांगितले. मग घाबरुन आपण त्या ठिकाणहून निघून गेलो असं ती म्हणाली. मात्र त्यावेळी आपल्याला कामाची आणि आर्थिक गरज असल्याने मी त्यांच्यासोबतचे काम सोडायला तयार नव्हते असं तिने एका प्रसिद्ध नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
“एक दिवस म्युझिक सेशन झाल्यानंतर त्यांनी दारू पिण्याचे नियोजन केले. त्यावेळी त्यांनी मलाही प्यायला लावली. त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या कारमध्ये बसवले. ते मला घरी सोडत आहेत असं मला वाटलं. पण त्यांनी मला एका हॉटेलमध्ये नेले आणि माझ्यावर अतिप्रसंग केला. मी रडले आणि विरोधही केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला घरी सोडले. मग मी काही दिवस कामावर जाणे टाळले. मात्र मी मध्येच काम सोडलं तर पैसे देणार नाही, असं त्यांनी सांगितल्याने मला पुन्हा कामावर जावं लागलं.” असं या महिलेने स्पष्ट केलं.
MeToo च्या निमित्ताने या नामांकित दिग्दर्शकाच्या बाबतीतील ही गोष्ट समोर आली आहे. सुभाष घई यांनी हिरो, त्रिमूर्ती, कर्मा, ताल, परदेस, राम लखन यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.