जळगाव : यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात भर चौकात गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली. 27 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 8 वाजता ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, कोळन्हावी येथील विकास उर्फ गौड जगनाथ साळुंखे याने धांभुर्णी येथे येऊन गावठी कट्ट्यातून हवेत गोळी झाडली. गोळीबारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला रात्री सुमारे एक वाजता कळका माता मंदिर परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने गावठी कट्टा व जिवंत काडतूस लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी आदर्श हॉटेलजवळील शेतातून गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझिन आणि एक जीवंत राउंड हस्तगत केला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक रणजित धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
जिल्ह्यातील डांभुर्णी (ता. यावल) येथे बियर बारचा मालक असलेल्या कोळन्हावीच्या सरपंचाने देशी बनावटीच्या कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याच्या घटनेने गुरुवारी रात्री खळबळ उडाली. सरपंचाने बियर बारमध्ये देशी दारूची विक्री होत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याच्या कारणावरून दोन तरुणांशी वाद झाल्यानंतर त्यांना धाक दाखविण्याच्या उद्देशाने हवेत गोळी झाडल्याचा पोलिसांचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी रात्रीपासून तपासाची चक्रे फिरवून शुक्रवारी पहाटेच संशयिताला अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा, एक जिवंत काडतूस आणि गोळीबारानंतरची एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित विकास सोलंके हा कोळन्हावी गावाचा सरपंच असून बियर बारचा मालकही आहे. गुरुवारी रात्री त्याच्या मालकीच्या बियर बारमध्ये देशी दारूची विक्री होत असल्याचा व्हिडिओ त्याच गावातील दोन तरुणांनी रेकॉर्ड केला. यावरून त्यांचा सोलंके याच्याशी वाद झाला. वाद वाढल्यानंतर संबंधित तरुणांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने सोलंके याने देशी बनावटीच्या पिस्तुलातून हवेत गोळी झाडल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. घटनेच्या वेळी संशयित मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.