मुंबईतील नेव्ही नगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली होती. मुंबईच्या नेवी नगर परिसरात नौदल सैनिकासह त्याची पत्नी आणि दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती. नेव्ही नगर परिसरात नौदलातील कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह दोन मुलांना विष देऊन आत्महत्या केली होती. नौदल सैनिकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होती तर पत्नी आणि दोन मुलांना जोवणातून विष दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
यावेळी मृत मुलांमध्ये दोन महिन्यांच्या बाळाचा आणि तीन वर्षांच्या मुलाचा समावेश होता. यावेळी पुरणलाल यांच्या पत्नी ओमा, मुलगा यश आणि दोन महिन्यांच्या बाळाला जेवणातून विषदेऊन मेहरा यांनी नंतर गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमागचं मुळ कारण समोर आलं नव्हत. त्याचाच शोध घेण्यासाठी घटनास्थळावरुन फॉरेन्सिक पुरावे गोळा केले. तसेच मृत्यूला कारणीभूत ठरलेला घटनाक्रम समजून घेण्यासाठी तपास अधिकारी कुटुंबीय, शेजारी आणि इतर संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यासाठी गेले.
दरम्यान याप्रकरणा संबंधित पोलिसांच्या तपासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत नौदल सैनिक पुरणलाल यांना 15 ऑगस्ट रोजी रात्री वडिलांनी गावाहून फोन केला होता. मात्र त्यांना पुरणलाल आणि त्यांचे कुटुंबीय प्रतिसाद देत नव्हते. सतत फोन करून देखील कोणाचाच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी नौदलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यानंतर नौदलाचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले त्या वेळी पुरणलाल घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले, तर त्यांची पत्नी आणि दोन मुले बेडरुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळली.
यानंतर कफ परेड पोलिसांनी या चौघांनाही त्वरित रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी पुरणलाल यांच्या वडिलांनी पोलिसांना एक महत्त्वाची माहिती दिली. 'आमचे मृतदेह घेऊ जा', असा संदेश पुरणलाल यांनी वडिलांना पाठवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुरणलाल यांच्या घराची पुन्हा तपासणी करण्यात आली. मात्र घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळलेली नाही. त्यामुळे पुरणलाल यांनी हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून सर्व संभाव्य पैलूंची पडताळणी केली जात आहे.