रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या दर्जाबाबत तक्रारी सुरू असतानाच जेवळी येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेशनच्या तांदळात चक्क सहा ते सात दातांचे संच आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जेवळी येथील विधवा महिला भागाबाई बाबुराव बिराजदार यांनी शुक्रवारी गणेश प्राथमिक सहकारी ग्राहक भांडाराच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानातून रेशनचे धान्य घेतले होते.
Sweets Price Hike : महागाईमुळे गणेश भक्तांचे बजेट कोलमडणार, पाहा मोदक-पेढे किती रुपयांनी महागले?
सायंकाळी त्यांच्या सुनेने भातासाठी तांदूळ चाळणीत घेतला असता, त्यामध्ये दातांचे संच आढळून आले. दात काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असून ते मानवी आहेत की प्राण्याचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार समोर येताच बिराजदार कुटुंबीयांनी शेजारी व नागरिकांना याची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देसाई आणि पांडुरंग बिराजदार यांनीही घटनेची दखल घेतली.
यापूर्वी रेशनच्या धान्यात किडे, आळ्या आणि जाळ्या आढळत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, आता तांदळात दातांचे संच आढळल्याने रेशन धान्याच्या गुणवत्ता नियंत्रणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून धान्याची तपासणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रेशनधारकांकडून होत आहे.