Amar Singh Chahal: निवृत्त आयजींनी झाडली स्वतःवर गोळी; 12 पानांच्या चिठ्ठीत केला खळबळजनक खुलासा

या घटनेने संपूर्ण पंजाब पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चहल सध्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.<br/>
Amar Singh Chahal: निवृत्त आयजींनी झाडली स्वतःवर गोळी; 12 पानांच्या चिठ्ठीत केला खळबळजनक खुलासा

Amar Singh Chahal: पंजाब पोलीस दलातील माजी आयपीएस (IPS) अधिकारी आणि निवृत्त महानिरीक्षक (IG) अमर सिंग चहल यांनी सोमवारी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण पंजाब पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. चहल सध्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?  

मिळालेल्या माहितीनुसार, अमर सिंग चहल हे पटियाला येथील त्यांच्या निवासस्थानी रक्ताच्या थारोळ्यात आढळले. त्यांनी स्वतःच्या परवानाधारक शस्त्रातून गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोळीबाराचा आवाज ऐकताच कुटुंबीयांनी धाव घेतली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा – Mumbai Local Train: भयंकर! रेल्वेत महिलांच्याच डब्यातून नराधमाचा प्रवास, उतरण्यास सांगितल्यानं त्यानं तरुणीलाचं धावत्या लोकलमधून फेकले खाली

12 पानांची शेवटची चिठ्ठी 

घटनेचा तपास करताना पोलिसांना घटनास्थळावरून 12 पानांची सविस्तर नोट सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये चहल यांनी आपल्या टोकाच्या पावलामागचे कारण स्पष्ट केले आहे. ऑनलाइन फसवणुकीमुळे (Cyber Fraud) आपले मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यातून निर्माण झालेला मानसिक त्रास सहन न झाल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अशा सायबर ठगांनी लक्ष्य केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

हेही वाचा – CBI Arrested Lt Col Deepak Kumar Sharma: लेफ्टनंट कर्नलच्या घरावर सीबीआयचा छापा; 2.23 कोटींची रोकड जप्त आणि पत्नीवरही कारवाई

वादग्रस्त 'फरीदकोट गोळीबार' प्रकरणाशी संबंध

अमर सिंग चहल यांचे नाव 2015 च्या बहुचर्चित फरीदकोट गोळीबार प्रकरणात आरोपी म्हणून समाविष्ट होते. 2023 मध्ये पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि सुखबीरसिंग बादल यांच्यासह चहल आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता.

पोलीस प्रशासनाची प्रतिक्रिया

पटियालाचे एसएसपी वरुण शर्मा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चहल यांची नोट ताब्यात घेण्यात आली असून त्यातील मजकुराची पडताळणी केली जात आहे. ज्या ऑनलाइन फसवणुकीचा उल्लेख चहल यांनी केला आहे, त्या अँगलनेही सायबर सेल तपास करत आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version