पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका कचरा वेचकाने पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षातून तब्बल 7 पिस्तुले चोरली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बिअर पिऊन कचरा वेचकाने चक्क पिस्तुले चोरली असल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दिवसभर पोलिसांना चोरीची कल्पनाच नव्हती, रात्री या कचरा वेचकाने पिस्तुलाच्या मदतीने धमकावल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.
समोर आलेल्या माहितीनुसरा, कचरा गोळा करत-करत हा कचरा वेचक सेंट्रल बिल्डिंगसमोरील मुद्देमाल कक्षात पोहोचला. त्यानंतर पाठीमागील दरवाजा उचकटून कचरा वेचकाने मुद्देमाल कक्षात प्रवेश केला. आत गेल्यानंतर आधी बिअरच्या बाटल्या चोरल्या आणि बिअर प्यायला. त्यानंतर मुद्देमाल कक्षातील 7 पिस्तुले घेऊन दिवसभर फिरत राहिला. रात्री साडेदहाच्या सुमारास साधू वासवानी चौकातून बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर येऊन त्याने एका व्यक्तीला पिस्तूल दाखवून हँडसप म्हणाला त्यानंतर ही माहिती संबंधित व्यक्तीने पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलिसांनी राकेशकुमार संजयकुमार चिटेकर याला ताब्यात घेतले असून चौकशीदरम्यान सेंट्रल बिल्डिंगसमोरील मुद्देमाल कक्षातून पिस्तूल चोरल्याची कबुली त्याने दिली. पिस्तुलावर ‘BL’ अक्षर दिसल्यानंतर पोलिसांना ते जप्त मुद्देमालातील असल्याचे लक्षात आले. कसून चौकशी केल्यानंतर आणखी 6 पिस्तुले चोरीला गेल्याचे समोर आले. आरोपीची पिस्तुलांची पिशवी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ठिकाणीच राहिली होती.
मात्र, दुसऱ्या एका फिरस्त्याने पिस्तुलांची पिशवी उचलून नेली. दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी पिशवी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा माग काढला. त्यानंतर जनरल पोस्ट ऑफिस परिसरातील झाडात लपवलेली पिशवी पोलिसांना सापडली. पिशवी उघडताच त्यामध्ये चोरीला गेलेली 6 पिस्तुले आढळली. रात्रभर शोध घेतल्यानंतर पोलिसांनी सर्व 7 पिस्तुले हस्तगत केली. तर राकेशकुमार चिटेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या मुद्देमाल कक्षातूनच 7 पिस्तुले चोरीला गेल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.