Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाने (मुंबई-अहमदाबाद) महाराष्ट्रात गती घेतली आहे. पालघर जिल्ह्याच्या भौगोलिक आव्हानांवर मात करत रेल्वे विभागाने 'एमटी-5' (MT-5) या 1.5 किलोमीटर लांबीच्या डोंगराळ बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील बुलेट ट्रेन मार्गावरील पूर्ण झालेला हा पहिलाच डोंगराळ बोगदा ठरला आहे.
हेही वाचा – What is PADU: मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच होणार 'PADU' चा वापर; मतदारांसाठी काय बदलणार?
काय आहे या बोगद्याचे वैशिष्ट्य?
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महत्त्वपूर्ण टप्प्याची घोषणा केली. हा बोगदा विरार आणि बोईसर या दोन प्रस्तावित स्थानकांना जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. आधुनिक 'ड्रिल-अँड-ब्लास्ट' तंत्रज्ञानाचा वापर करून अवघ्या 18 महिन्यांत हे खोदकाम पूर्ण झाले. जमिनीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रिअल-टाइम मॉनिटरिंगसह शॉटक्रिट लाइनिंग आणि रॉक बोल्टचा वापर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील एकूण 7 बोगद्यांचे जाळे
मुंबई-अहमदाबाद या 508 किमीच्या मार्गापैकी 156 किमीचा टप्पा महाराष्ट्रातून जातो. या प्रवासात निसर्गाचा अडथळा दूर करण्यासाठी डोंगरांमधून एकूण 8 बोगदे खोदले जाणार आहेत, ज्यातील 7 बोगदे एकट्या महाराष्ट्रात आहेत. सद्यस्थितीत या बोगद्यांचे सुमारे 30 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामही युद्धपातळीवर सुरू आहे. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबईकरांसाठी गुजरातचे अंतर केवळ 1 तास 58 मिनिटांत कापले जाईल. या प्रकल्पामुळे साबरमती, अहमदाबाद, बडोदा, सुरत, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई ही शहरे एकाच वेगाने जोडली जाणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.