सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत पतीच्या छळाला कंटाळून 26 वर्षीय आईने 10 महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून पाण्याच्या बादलीत बुडवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकचं नव्हे तर दोन्ही लेकींना घेऊन तिनं स्वत:च पोलीस ठाण्यात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा योगेश खुरदामळे असं आरोपी आईचं नाव असून ती मूळची नांदेडच्या शिरढोणची असून सध्या सोलापूर येथील बार्शी येथे राहत होती. याबाबतीत मोठी मुलगी तेजल हिने पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.
नवरा सकाळी कामावर गेल्यानंतर पूजाने आधी 10 महिन्यांच्या तिच्या बारक्या मुलीचा गळा दाबून तिला पाण्याच्या बादलीत बुडवले. त्यानंतर ती 6 वर्षांच्या तेजलच्या दिशेने वळली. तेजलचाही गळा दाबून तिच्या तोंडावर उशी दाबली ज्यामुळे तिचा श्वास गुदमरू लागला. मात्र ती घाबरून आईला ओरडून आणि रडून विनवण्या करू लागली. 'मम्मी, मी शाळेत चांगली शिकते, मला मारू नकोस' अशी गयावया करत त्या चिमुकलीने आपल्याच आईकडे आपल्या प्राणाची भीक मागितली. त्यामुळे या थरारक घटनेतून सुदैवाने तेजलचा जीव वाचला.
यानंतर पूजा मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली. यावेळी तिने पोलिसांसमोर कबुली देत म्हटलं की, “माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मुलीची हत्या केली, मला अटक करा". पूजा ही तिच्या 2 मुलींना संपवून स्वतः देखील आत्महत्या करणार होती. मात्र ते तिला शक्य झालं नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तिचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी तात्काळ 10 महिन्यांच्या मुलीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी शक्तीला मृत घोषित केले. दरम्यान पूजा योगेश खुर्दामळे हिच्याविरुद्ध BNS कलम 103(1) आणि 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.