Gas Cylinder Explosion: दौंड-पाटस अष्टविनायक रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल जगदंबा येथे बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत हॉटेलचे 12 कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी 6 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. स्फोट इतका भयानक होता की, गॅस सिलिंडर हवेत उडून बाहेर कोसळले आणि आगीच्या लोळांनी स्वयंपाकघराला विळखा घातला. सुदैवाने, घटनेच्या वेळी हॉटेलमध्ये ग्राहक उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
बेकायदेशीर घरगुती सिलिंडरचा वापर?
प्राथमिक तपासात हॉटेलमध्ये एकूण 22 गॅस सिलिंडर आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यात 10 व्यावसायिक सिलिंडरसोबतच 12 घरगुती सिलिंडरचा साठा होता. नियमानुसार व्यावसायिक कामासाठी घरगुती सिलिंडर वापरणे बेकायदेशीर आहे. याच बेकायदेशीर घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा – Solapur Election 2026: ओवैसींच्या समोर माजी नगरसेवक ढसाढसा रडला; सोलापूरच्या सभेत नेमकं काय घडलं?
जखमींना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवले
या अपघातात जखमी झालेल्या 12 कर्मचाऱ्यांपैकी सहा जण 80 टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. त्यांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर दौंडमधील खासगी आणि उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील यादवनपूर येथील कन्हैया वर्मा, वरुण वर्मा, दीपक कुमार, मोहन कुमार यांच्यासह 10 पुरुष कर्मचाऱ्यांचा आणि भाकरी बनवणाऱ्या स्थानिक महिला कर्मचारी सीमा पाचपुते यांचा समावेश आहे.
प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, दौंड नगरपरिषद आणि कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तहसील आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव आणि विस्तार अधिकारी डॉ. दिलीप जगताप यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. सध्या आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली जखमींवर उपचार सुरू आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.