Sangli Student Ends Life: राजधानी दिल्लीमध्ये एका दहावीच्या विद्यार्थ्याने शाळेतील प्राचार्या आणि काही शिक्षिकांकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. शौर्य प्रदीप पाटील, असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. शौर्य हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावचा रहिवासी दिल्लीतील राजीव नगरमध्ये कुटुंबासह राहत होता. शौर्य दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीत शिकत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, एका दीड पानी सुसाइड नोटमध्ये त्याने प्राचार्या अपराजिता पाल तसेच शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस यांच्याकडून सतत मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मेट्रो स्टेशनवरून उडी
दरम्यान, 18 नोव्हेंबर रोजी दुपारी, राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून शौर्यने उडी मारली. जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विद्यार्थ्याच्या वडिलांचा गंभीर आरोप
शौर्यच्या वडिलांनी सांगितले की, शौर्य गेल्या काही महिन्यांपासून शाळेतील शिक्षकांच्या वागणुकीमुळे त्रस्त होता. त्यांच्या मते, “शिक्षक त्याला प्रत्येक क्षुल्लक कारणावरून ओरडत असत. आम्ही अनेकदा तक्रार केली पण काहीच कारवाई झाली नाही. दहावीच्या परीक्षा जवळ आल्या असल्याने शाळा बदलण्याचा निर्णयही आम्ही टाळला,” असेही ते म्हणाले.
सुसाइड नोटमध्ये काय लिहिले होते?
शौर्यच्या शाळेच्या बॅगमध्ये पोलिसांना सुसाइड नोट मिळाली असून त्यातील मजकूर हेलावून टाकणारा आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, “शाळेतील लोकांनी मला इतका त्रास दिला की, मी हा निर्णय घेतला. सॉरी मम्मी-पप्पा, तुम्हाला शेवटचं दुखवतोय. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले, पण मी त्यांच्यासाठी काहीही करू शकलो नाही. शक्य असल्यास माझे अवयव गरजू व्यक्तींना दान करा. युक्ती मॅडम, पाल मॅडम आणि मनू कालरा यांच्याविरोधात कारवाई व्हावी, ही माझी शेवटची इच्छा आहे.”
चार शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल
सुसाइड नोटमधील आरोपांच्या आधारे राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्राचार्या अपराजिता पाल आणि शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन व ज्युली व्हर्गिस यांच्या विरोधात मानसिक छळाचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरु आहे. बुधवारी रात्री शौर्यचा मृतदेह सांगलीतील ढवळेश्वर गावी पोहोचवण्यात आला. गुरुवारी त्याचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.