पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 वर्ष हा सगळा छळ सहन केल्यानंतर पत्नीनं हिंमत दाखवत पोलिसात धाव घेतली आणि पतीसह सासूवर गुन्हा दाखल झाला. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पत्नीचा अनेक वर्षे शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप पोलीस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि त्याची आई अनुसया टोणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पत्नी गर्भवती असताना तिला मारहाण करून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे. 2025 मध्ये गर्भलिंग चाचणी करून गर्भात मुलगी असल्याचे समजल्यानंतर जबरदस्तीने गर्भपातासाठी दबाव आणला. त्यानंतर महिलेने गर्भपातास नकार दिल्यास दोन्ही मुलींना घेऊन माहेरी जाण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पतीने पोलीस उपनिरीक्षक असल्याचा धाक दाखवत फिर्यादीच्या वडिलांनाही धमकावल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. धनाजी टोणे सध्या मांजरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे, तर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते रजेवर गेल्याची पोलिसांची माहिती आहे. दरम्यान पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.