सांगली : कॉटन मिल चाळ रोड परिसरात जुन्या वादातून झालेल्या भांडणात चाकूने वार करून 29 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. बसवराज कलाप्पा अडकाई (रा. अहिल्यानगर झोपडपट्टी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी मृत बसवराज याने संशयित आरोपीच्या वडिलांना मारहाण केली होती. याच जुन्या कारणाचा राग मनात धरून रविवारी पेठ, माधवनगर येथील विश्वजीत दीपक लोंढे आणि अहिल्यानगर, कुपवाड येथील सौरभ सोमनाथ नलावडे यांच्यात बसवराजसोबत वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संशयित आरोपींनी चाकूने बसवराज याच्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान अथवा घटनेनंतर त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास संजयनगर पोलिसांकडून सुरू आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिली.