नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांपासून घरात डांबून ठेवण्यात आलेल्या एका 16 वर्षाच्या मुलाची पोलीस व जिल्हा बाल विकास अधिकाऱ्यांच्या मदतीने सुटका करण्यात आली. कौटुंबिक कलह व अचानक बसलेला आर्थिक फटका त्यातच पत्नीचे झालेले निधन यामुळे मानसिक स्थिती बिघडलेल्या वडिलानेच पोटच्या मुलाला घरात डांबून ठेवले होते.
पीडित मुलाच्या आत्याने पोलिसांनी हि माहिती दिली त्यांनतर पोलिसांनी कारवाईत करत मुलाला आपल्या ताब्यात घेत बाल सुधारगृहात त्याची रवानगी केली. दरम्यान दोन वर्ष घरात डांबून राहिलेल्या या मुलाने दोन वर्षे शाळेचे दार पाहिले नाही, त्याची मित्रांशी भेट झाली नाही एवढचं नव्हे तर त्याची दहावीची परीक्षाही हुकली. त्याचं बोलणेही कमी झाले होते.
मानसिक तणावाच्या छायेत जगणाऱ्या या मुलाची अखेर चाइल्ड हेल्पलाइन 1098 आणि बेलतरोडी पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे त्या कोंडलेल्या आयुष्यातून सुटका झाली. गृहभेटीदरम्यान मुलाची अवस्था पाहून पथकाला धक्काच बसला. तो अत्यंत कमी बोलत होता. त्याच्या वर्तनातून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि तणावग्रस्त असल्याचे प्रथमदर्शनी जाणवले.
वडील 'फॉरेन रिटर्न' असल्याची माहितीदेखील चौकशीत मिळाली. दरम्यान नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्यात वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र दोन वर्षांचा हरवलेला काळ भरून काढत त्याला पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे आव्हान आता यंत्रणेसमोर आहे.