नाशिकमधील चांदवड येथे 76 वर्षीय चंद्रभागा धुळाजी व्हरकटे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या, 29 ऑगस्टला मुलाला भेटायला जात असतानाच त्या बसस्थानकाजवळील उघड्या विहिरीत पडल्या. त्या घरी परतल्या नाहीत म्हणून कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच त्या बसस्थानकाजवळील उघड्या विहिरीत पडल्याचे समोर आले. तब्बल दोन दिवस अन्न-पाण्याविना त्या अंधाऱ्या विहिरीत मोटारीच्या पाईपला आणि दोरीला धरून जीव वाचवत राहिल्या. मोठ्या धैर्याने त्यांनी ती पकड घट्ट करून ठेवलेली, यामुळे देवाने त्यांची हाक ऐकली आणि स्थानिक युवक गणेश पारवे यांच्या हे दृश्य नजरेस पडले.
त्यानंतर स्थानिक युवक, चांदवड पोलीस आणि नगरपरिषदेचे पथक घटनास्थळी पोहचले आणि जलद गतीने त्यांचे बचावकार्य सुरु झाले. स्थानिक युवकांनी अंधाऱ्या विहिरीत उतरून आजींना खाटेच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे व जीवन जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे मोठा अनर्थ टळला.
यापूर्वीही अशा घटनांची नोंद झाली असून त्यावर योग्य ती कारवाई न झाल्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. विहिरीभोवती ताबडतोब सुरक्षा जाळी आणि कठडे बसवण्याची मागणी केली आहे.