LPG Carriers Cargoes: मध्य पूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या लष्करी संघर्षामुळे होर्मूझच्या सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) सागरी वाहतूक धोक्यात आली आहे. याच भागात अडकलेली भारताची 6 एलपीजी जहाजे बाहेर काढण्यासाठी सरकारने कूटनीतिक प्रयत्न तीव्र केले आहेत. भारताच्या स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, खाडी क्षेत्रात अडकलेली सुटणे महत्त्वाचे आहे. या जहाजांवर सुमारे 3 लाख टन इंधन असून, ती गेल्या अनेक आठवड्यांपासून तेथेच नांगर टाकून उभी होती. यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण झालेली गॅसची टंचाई आता दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे.
इराणकडून दोन जहाजांना 'स्पेशल क्लीयरेंस'
भारताच्या सततच्या पाठपुराव्यानंतर इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) काही निवडक जहाजांना रस्ता देण्यास संमती दर्शवली आहे. यामध्ये 'जग वसंत' (Jag Vasant) आणि 'पाइन गॅस' (Pine Gas) या दोन मोठ्या टँकर जहाजांना विशेष परवानगी मिळाली असून त्यांनी होर्मूझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली आहे. ही जहाजे 26 ते 28 मार्चदरम्यान भारतीय बंदरांवर पोहोचतील. यामुळे गॅस पुरवठ्यात स्थिरता येईल. सध्या इराणने ठरवून दिलेल्या विशेष मार्गावरूनच आणि प्रत्येक टप्प्यावर परवानगी घेऊन ही जहाजे पुढे सरकत आहेत.
ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा 'प्लान-बी' सज्ज
केवळ आयातीवर अवलंबून न राहता, केंद्र सरकारने पर्यायी व्यवस्थांवरही काम सुरू केले आहे. तेल कंपन्यांना देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, भविष्यात अशा संकटांचा सामना करण्यासाठी भारत आता आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या मदतीने पर्यायी सागरी मार्गांचा शोध घेत आहे. ज्या देशांमधून विनाअडथळा गॅस पुरवठा होऊ शकेल, अशा नवीन बाजारपेठांशी संपर्क साधला जात असून 'केस-बाय-केस' आधारावर महत्त्वाच्या खेपांना मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कसा असेल पुढील प्रवास?
अडकलेल्या 6 जहाजांमध्ये एकूण 3 लाख टन एलपीजी असून, त्यातील दोन जहाजे आता प्रवासाला निघाली आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे विमा कंपन्यांनी या मार्गावरील जहाजांसाठी प्रीमियम वाढवला असून, भारतीय नौदलही या जहाजांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून आहे. ही जहाजे भारतात लवकर आणि सुखरूप पोहोचल्यास घरगुती ग्राहकांना गॅसच्या वाढत्या किमती आणि संभाव्य टंचाईपासून मोठा दिलासा मिळेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.