महाराष्ट्र राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे.
राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.
राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला होता. या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांना एसटी प्रवासात ५० टक्क्यांची सूट देण्याची घोषणा केली होती. त्याच बरोबर महिलांना सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करणार असल्याचे ते म्हणाले. महिलांना ही सुविधा दिल्याने बहुधा प्रवास करणाऱ्या महिलांना याचा फायदा होणार आहे. काही महिला कामानिमित्त रोज प्रवास करतात, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. खासगी वाहनाने प्रवास करून जास्त पैसे खर्च करण्याऐवजी या महिला आता अर्ध्या तिकिटात एसटी बसने प्रवास करतील.