Officers Promotion: महसूल विभागातील 47 वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला 47 नवे अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून अडकलेल्या बढत्या अखेर शासनाच्या आजच्या आदेशाद्वारे मंजूर केल्या गेल्या, ज्यामुळे महसूल अधिकाऱ्यांना सरकारकडून एक प्रकारची ‘दिवाळी भेट’चं मिळाली आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयातील दालनातून राज्यातील सर्व जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी मंत्री बावनकुळे म्हणाले की, महसूल विभाग जनतेशी थेट संबंध ठेवणारा महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसह काम करणे आवश्यक आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत विभाग अधिक बळकट व्हावा आणि राज्याच्या प्रगतीत योगदान द्यावे, असा संदेश दिला.
शासन आदेशानुसार, अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी (गट-अ) यांना निवडश्रेणीच्या पदावर नियमित पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये वेतनश्रेणी एस 25-1 (78,800–2,09,200) पासून एस 27-11 (1,23,100–2,15,900) या श्रेणीपर्यंत वाढ झाली आहे. आदेशात अधिकाऱ्यांना नव्या पदावर 30 दिवसांच्या आत हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत.
महसूल विभाग जनतेच्या आशा, आकांक्षांना मूर्तरूप देणारा विभाग आहे. हा विभाग अधिकाधिक जनताभिमुख व्हावा. पारदर्शी रहावा, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. सर्वसामान्य जनतेशी थेट संबंध येणाऱ्या मोजक्या शासकीय विभागांपैकी आपला हा विभाग महत्वाचा घटक आहे. तो अधिक बळकट व्हावा, कार्यक्षम… pic.twitter.com/w3GnlD6k5L — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 20, 2025
महसूलमंत्री बावनकुळे यांनी मंत्रालयातून जवळपास 1,600 अधिकाऱ्यांशी संवाद साधत विभागीय कामगिरीबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच नोंदणी व भूमी अभिलेख विभागातील अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की महसूल विभागाची कामगिरी जनतेच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करणारी असावी. तसेच सर्व अधिकाऱ्यांनी मिळून पारदर्शक, कार्यक्षम व जनताभिमुख कार्य करावेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.