जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यात बलात्काराच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सातत्याने बलात्काराच्या घटना समेर यात आहेत. मुंबईच्या विलेपार्ले भागात अशाच प्रकारची एक संतापजनक घटना घडली आहे. व्हिडीओ क्लिप्सचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर नऊ जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. 15 वर्षीय मुलीवर एक-दोन नव्हे तर नऊ जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर विलेपार्ले पोलिसांनी नऊ जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपासणीत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील एक आरोपी हा एका स्थानिक राजकीय नेत्याचा मुलगा आहे.
पिडित जवळच्या परिसरातील एका तरुणाच्या घरी अभ्यासाला जात असे. त्यावेळी संधी साधून तरुणाने तिला आपल्या जाळ्यात फसवले. या संपूर्ण प्रकाराची व्हिडीओ क्लिप बनवली. त्याआधारे या तरुणाने तिला वारंवार ब्लॅकमेल करून अत्याचार करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर ही क्लिप आपल्या इतर मित्रांनाही पाठवली. अशा प्रकारे नऊ जणांनी तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आमचे म्हणणे न ऐकल्यास ही क्लिप व्हायरल करू, अशी धमकीही ते वारंवार देत होते. या मुलीवर नऊ जणांनी वारंवार बलात्कार केले. तणावाखाली असलेल्या मुलीची प्रकृती बिघडत गेली. त्याचे कारण आईने विचारले असता तिने सगळा प्रकार आईला सांगितला. यानंतर विलेपार्ले पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी कारवाई करत आठ जणांना अटक केली आहे.