सध्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्याच्या विविध भागांतून समोर येणाऱ्या धक्कादायक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असतानाच आता कल्याणमधूनही एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अत्याचार करणारा आरोपी सौरभ सोनवणे याला कल्याण जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षाची पीडित मुलगी अहिल्यानगरहून आपल्या मामाला भेटण्यासाठी कल्याणला आली होती. कल्याणहून तिला मामाच्या घरी खोपोलीला जायचे होते. खपोलीला जाण्यासाठी ती कल्याण रेल्वे स्थानकावर ट्रेनच्या प्रतीक्षेत होती. त्यावेळेस रेल्वे स्थानकावर तिला सौरभ सोनवणे भेटला. पीडित अल्पवयीन मुली सोबत काहीही ओळख नसताना सौरभ याने पीडित मुलीचे मोबाईल हिसकावून घेतले. मुलीने जेव्हा मोबाईल परत मागितला तेव्हा सौरभ याने सांगितलं मोबाईल परत पाहिजे तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल.
सौरभ सोनवणे पीडित मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन न जाता कल्याण रेल्वे यार्डात घेऊन गेला. त्यानंतर सौरव यांनी पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. कशीबशी त्याच्या तावडीतून सुटून अल्पवयीन मुलगी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचली. कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच आणि जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साह्याने आरोपी सौरभला शोधून काढले. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.