Red Sandalwood Seized: कर्नाटक पोलिसांनी आंतरराज्यीय लाल चंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एकूण 1143 किलो लाल चंदनाचे लाकूड आणि तीन आलिशान वाहने जप्त केली आहेत. तस्करी करण्यात आलेल्या लाल चंदनाची अंदाजे किंमत 1 कोटी इतकी आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून, उर्वरित साथीदार अजून फरार आहेत. दरम्यान, ही कारवाई इलेक्ट्रॉनिक सिटी डिव्हिजनचे डीसीपी एम. नारायण (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, तर एसीपी के.एम. सतीश यांनी कारवाईचे पर्यवेक्षण केले. हुलीमावू पोलीस स्टेशनचे अधिकारी बी.जी. कुमारस्वामी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
हेही वाचा – Crime News: माता न तूच वैरिणी! गोंडस मूल दिसलं की पाण्यात बुडवून मारायची; स्वतःच्या मुलालाही सोडलं नाही
पोलिसांनी सांगितले की, 7 नोव्हेंबर रोजी भाटमीधर नावाच्या नागरिकाने बनरघट्टा मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्क केलेली कार असल्याची तक्रार केली. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने बेकायदेशीर लाल चंदन विक्रीची कबुली दिली. त्याच्याकडून 95 किलो लाल चंदन आणि एक कार जप्त करण्यात आली. तसेच या प्रकरणी वन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीला 8 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करून 20 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान आरोपीने उघड केले की, त्याने आणि त्याच्या साथीदारांनी आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून कमी किमतीत लाल चंदन खरेदी करून ते तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये जास्त किमतीत विकले. त्याच्या दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून एकूण 1143 किलो लाल चंदन आणि तीन वाहने जप्त केली. फरार असलेल्या साथीदारांचा शोध सुरू असून, तपास अद्याप सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.