Drinking Water From Clay Pots In Summer Benefits : उन्हाळ्यात अंगाची लाही होत असताना पाणीच शरीराला थंडावा देतं. हे पाणी जर माठातलं म्हणजे मातीच्या घड्यातलं असेल तर खूप उत्तम. अनेक लोक उन्हाळ्यात माठातील थंड पाणी पिण्यास प्राधान्य देतात. कारण, ते केवळ थंडच नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. पण माठ खरेदी करताना कधीही रंगीत माठ घेऊ नये.
उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी फ्रिजमधल्या थंड पाण्यापेक्षा माठातलं पाणी अधिक आरोग्यदायी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बरेच लोक थंड पाणी पिण्यासाठी माठ वापरण्याचा पर्याय निवडतात. पण हा माठ खरेदी करताना योग्य पद्धतीने निवडणं आवश्यक आहे. माठ योग्य प्रकारे वापरण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत. यामुळे आरोग्याला अपाय होणार नाही.
तर, आपणा सर्वांना हे माहीतच आहे की, माठातलं पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. तेव्हा, माठ खरेदी करताना पुढील खबरदारी घ्यावी.
हेही वाचा – उष्माघात होणं टाळायचंय? मग हे सोपे घरगुती उपाय करा; उन्हाळ्यात राहील थंडावा
माठ खरेदी करताना काय लक्षात ठेवाल?
रंगीत माठ खरेदी करू नका
माठ खरेदी करतांना आपल्याला विविध प्रकारचे माठ दिसतील, पण लक्षात ठेवा, रंगीत माठ खरेदी करू नये. रंगीत माठात ठेवलेले पाणी प्यायल्याने अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. अनेकदा माठ बाहेरून रंगवला जात असल्याने हे रंग खाण्याचे नसतात. तसेच, हल्ली बाजारात खाण्याचे रंग म्हणून विकले जाणारे रंगांवर कुणाचेही नियंत्रण नसते. त्यामुळे ते सुद्धा हानिकारक ठरू शकतात. कारण माठ मातीचा असल्याने त्याला अत्यंत सूक्ष्म छिद्रे असतात. त्यामुळे बाहेर लावलेल्या रंगाचा आतील पाण्यावर विपरीत परिणाम होण्याची पूर्ण शक्यता असते. त्यामुळे, कधीही रंगीत माठ वापरू नका.
माठ स्वच्छ करणे
माठ खरेदी केल्यानंतर त्यात हात घालून घासून साफ करू नका. त्याऐवजी, त्यात थोडे पाणी घालून ते फिरवून, पाणी काढून टाका. यामुळे माठ स्वच्छ होईल. आतून जोरात घासू नका. नाहीतर, त्याची माती निघू शकते. माठात सुरुवातीला पाणी ठेवल्यानंतर त्यात माती आल्यासारखे वाटल्यास ते पाणी स्वच्छ कापडाने गाळून घ्या.
माठ स्वच्छतेसाठी डिटर्जंटचा वापर टाळा
माठ स्वच्छ करण्यासाठी आपण कधीही मीठ, साबण किंवा डिटर्जंट वापरू नका. यामुळे माठ खराब होऊ शकतो आणि पाण्याचा दर्जा कमी होऊ शकतो.
माठात ओलावा ठेवा
माठ वापरण्यासाठी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ह्या कोणत्याही ऋतूत योग्यच आहे. मात्र, माठ कधीही कोरडा होऊ देऊ नका. माठात नेहमी पाणी असायला हवे. पाणी दोन-तीन दिवस ठेवल्यानंतर ते वापरले गेले नसल्यास काढून टाका. हलक्या हाताने माठ आतून स्वच्छ करून त्यात दुसरे पाणी भरा. यामुळे माठ खराब होणार नाही.
हेही वाचा – उन्हाळ्यात साप चटकन हल्ला का करतात? सर्पदंश टाळण्यासाठी घ्या अशी खबरदारी
माठ खरेदी करण्यापूर्वी हे करा
जेव्हा माठ खरेदी करायला जाता, तेव्हा त्यावर एकदा बोटाने टिचकी मारून बघा. जो माठ ‘टन-टन’ आवाज करतो, तो माठ चांगला असतो. याशिवाय, माठाचा आवाज जर थोडासा बदलला असेल, तर तो माठ घेऊ नका. कदाचित एखाद्या माठाला अगदी बारीक तडा गेलेला असू शकतो, जो आपल्या लक्षात आलेला नसतो. मटका वापरण्याचे योग्य पद्धतींना अनुसरण करून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.