Table Top Red Marking Highway in MP : मध्य प्रदेशातील निसर्गरम्य जंगलातून प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी आता एक नवीन आणि अनोखे आकर्षण पाहायला मिळणार आहे. 'वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पा'तून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) भारताचा पहिला 'रेड कार्पेट' हायवे तयार केला आहे. पर्यटनाचा आनंद घेताना निसर्ग आणि वन्यजीवांची सुरक्षा कशी राखता येते, याचे हे एक जागतिक दर्जाचे उदाहरण ठरले आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) रस्ते सुरक्षा आणि वन्यजीवांचे संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. मध्य प्रदेशातील 'वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पा'तून (पूर्वीचे नौरादेही अभयारण्य) जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भारतातील पहिला 'टेबल-टॉप रेड मार्किंग' प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. दुबईतील प्रसिद्ध शेख जायद रोडच्या धर्तीवर महामार्गाच्या 2 किलोमीटर लांबीच्या घाट परिसरात रस्त्याचा पृष्ठभाग आता गडद लाल रंगात चमकताना दिसत आहे.
लाल रंगाचा रस्त्यावरील परिणाम आणि तंत्रज्ञान
या विशेष प्रकल्पांतर्गत धोक्याच्या क्षेत्रात रस्त्यावर 5 मिमी जाडीचा थर्मोप्लास्टिकचा थर गरम करून लावण्यात आला आहे. हा गडद लाल रंग वाहनचालकांना तातडीने सावध करतो की, ते आता अशा भागात प्रवेश करत आहेत जिथे वेग मर्यादा पाळणे आणि वन्यजीवांची काळजी घेणे अनिवार्य आहे. या थराची पृष्ठभाग थोडीशी खडबडीत असल्याने वाहनाच्या टायरचा स्पर्श होताच एक विशिष्ट आवाज येतो, ज्यामुळे चालक अचानक ब्रेक न लावता नैसर्गिकरित्या वाहनाचा वेग कमी करतो.
वन्यजीवांसाठी 'सायलेंट' सुरक्षा कवच
पारंपारिक रंबल स्ट्रिपच्या तुलनेत हा लाल रस्ता कमी आवाज करतो, ज्यामुळे जंगलातील शांतता भंग होत नाही आणि प्राण्यांनाही त्रास होत नाही. पर्यावरण आणि विकास यांच्यातील उत्तम समतोल राखण्यासाठी 1.96 किलोमीटरच्या या पट्ट्यात 25 विशेष अंडरपास तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून प्राणी महामार्गाच्या खालून सुरक्षितपणे ये-जा करू शकतील. याशिवाय, प्राणी थेट रस्त्यावर येऊ नयेत आणि त्यांनी अंडरपासचाच वापर करावा, यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना उंच कुंपण लावण्यात आले आहे.
आधुनिक अभियांत्रिकी आणि देखरेख
NHAI ने या पुलांवर सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले आहेत, ज्याद्वारे वन्यजीवांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जाते. आधुनिक अभियांत्रिकीच्या माध्यमातून मानवी जीवन आणि वन्यजीव या दोघांनाही एकाच वेळी कसे सुरक्षित ठेवता येते, याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. येथील लाल रस्ते हे आता केवळ धोक्याचे संकेत नसून ते निसर्ग संरक्षणाचे आणि हरित विचारांचे प्रतीक बनले आहेत. या प्रकल्पामुळे अपघातांची संख्या कमी होऊन मानवी जीव वाचतील आणि वन परिसंस्थेचे अखंडत्व जपले जाईल, अशी खात्री NHAI ने व्यक्त केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.