Davinder Singh Garcha Passes Away: भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णकाळ दाखवणारे दिग्गज खेळाडू आणि निवृत्त आयपीएस अधिकारी दविंदर सिंग गरचा यांचे जालंधर येथे निधन झाले. 7 डिसेंबर 1952 रोजी जन्मलेल्या गरचा यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्र आणि पोलीस दलात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच क्रीडा प्रेमी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
1980 च्या ऑलिंपिक विजयाचे शिल्पकार
दविंदर सिंग गरचा हे 1980 च्या मॉस्को उन्हाळी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे अत्यंत महत्त्वाचे सदस्य होते. त्या ऐतिहासिक स्पर्धेत त्यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत 6 सामन्यांत तब्बल 8 गोल केले होते. आपल्या कारकिर्दीत 30 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या गरचा यांनी एकूण 19 गोल नोंदवले होते. मैदानातील त्यांची चपळता आणि गोल करण्याची अचूकता यामुळे ते त्या काळातील सर्वात प्रभावशाली खेळाडू मानले जात.
हेही वाचा – WPL 2026: मुंबई इंडियन्सच्या हरमनचा ‘चाबूक’ फटका; नाबाद 74 धावा करत दिल्लीला चारली धूळ
मैदानावर खेळाडू, प्रशासनात कणखर अधिकारी
केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर प्रशासकीय सेवेतही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. भारतीय पोलीस सेवेत (IPS) अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी अत्यंत प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख निर्माण केली होती. निवृत्तीनंतरही त्यांनी हॉकीशी असलेले नाते तुटू दिले नाही. प्रसिद्ध मोहिंदर सिंग मुन्शी हॉकी स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक तरुण खेळाडूंना व्यासपीठ मिळवून दिले आणि हॉकीचा वारसा पुढे नेण्यात मोलाची भूमिका बजावली.
SAD NEWS!
Olympian & Gold Medalist Davinder Singh Garcha, IPS (Retd) is no more… I am very sorry to inform you the sad news about the demise of Olympian & Gold Medalist Mr.Davinder Singh Garcha, IPS (Retd) today. pic.twitter.com/jwIoFhOZzQ — 42nd IndianOil Surjit Hockey Tournament-2025 (@surjit_hockey) January 10, 2026
दरम्यान, सुरजित हॉकी समितीसह अनेक दिग्गज ऑलिंपियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी गरचा यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांचे योगदान भारतीय हॉकीच्या सुवर्ण इतिहासाचा अविभाज्य भाग आहे, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी केले जातील, याची माहिती लवकरच कुटुंबाकडून दिली जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.