IVF Success in Old Age : गुजरातमध्ये जिवुनबेन रबारी नावाच्या 70 वर्षीय महिलेने आयव्हीएफ (IVF – In Vitro Fertilization) तंत्रज्ञानाद्वारे आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांचे लग्न होऊन 45 वर्षे पूर्ण झाली होती आणि त्यांचे पती 75 वर्षांचे आहेत. या वृद्ध जोडप्याला मूल व्हावे अशी तीव्र इच्छा होती, ज्यामुळे सामान्यपणे पालकत्वाचे त्यांचे वय नसूनही त्यांनी आयव्हीएफ प्रक्रियेचा आधार घेतला. जिवुनबेन यांची प्रसूती सिझेरियन पद्धतीने झाली असून, आई आणि बाळ दोघेही निरोगी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जिवुबेन जगातील सर्वात वयस्कर मातांपैकी एक असल्याचा दावा केला जात आहे.
वाढत्या वयात आयव्हीएफ यशस्वी होण्याची शक्यता
आई होणे ही भावना महिलांसाठी अतिशय सुखद असली तरी, वय वाढल्यानंतर बाळाला जन्म देण्याच्या प्रक्रियेत अनेक शारीरिक आणि मानसिक अडथळे निर्माण होतात. अनियमित मासिक पाळी (Menstrual Cycle), शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन (Hormone Imbalance), मानसिक ताण आणि पोषक घटकांचा अभाव यांसारख्या गोष्टींचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो. वाढत्या वयात आयव्हीएफ शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता काहीशी कमी होते; कारण स्त्रीच्या शरीरातील अंड्यांची गुणवत्ता (Egg Quality) आणि प्रमाण कमी होऊन जाते, ज्यामुळे यशस्वी गर्भधारणा होणे काहीवेळा कठीण होते.
हेही वाचा – Joint Care in Winter : हिवाळ्यात सांधेदुखी वाढण्याचं कारण आहार, वय की आणखी काही? हे उपाय देतील आराम
डोनर एग्स आणि 'जेनेटिक स्क्रीनिंग'चा पर्याय
जरी वय वाढल्यानंतर आयव्हीएफची यशस्वी होण्याची शक्यता कमी असली, तरी ते अशक्य नाही. साधारणतः 35 ते 40 या वयोगटातील महिलांसाठी या ट्रीटमेंटच्या यशाचा दर मध्यम असतो. मात्र, ज्या महिलांचे वय जास्त आहे आणि त्यांच्या अंड्यांची गुणवत्ता पुरेशी नाही, अशांसाठी डोनर अंड्यांचा (Donor Eggs) वापर करून आयव्हीएफ करणे फायद्याचे ठरते. याशिवाय, प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक स्क्रीनिंग (Pre-Implantation Genetic Screening) या चाचणीमुळे गर्भाची अनुवांशिक तपासणी (Genetic Screening) करून योग्य क्रोमोसोम (Chromosome) असलेल्या भ्रूणांची निवड केली जाते, ज्यामुळे यशस्वी गर्भधारणा करणे शक्य होते.
जगातील सर्वात वयस्कर माता आणि वैद्यकीय तयारी
जिवुबेन यांना गर्भधारणेसाठी तयार करण्यासाठी डॉक्टरांना आयव्हीएफपूर्वी त्यांच्यावर काही तयारीचे उपचार करावे लागले, ज्यात त्यांची मासिक पाळी नियमित करणे आणि गर्भाशय तयार करणे समाविष्ट होते. दरम्यान, 2009 मध्ये यूकेच्या एलिझाबेथ आदिनी यांच्या नावावर जगातील सर्वात वयस्कर आईचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. परंतु, वाढत्या वयात त्यांच्या देशात आयव्हीएफ तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मुलाला जन्म देण्यासाठी युक्रेनला जावे लागले होते. एकूणच, वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गुंतागुंतीमुळे किंवा वाढत्या वयामुळे मूल न होऊ शकणाऱ्या अनेक जोडप्यांसाठी आयव्हीएफ एक वरदान ठरले आहे.
हेही वाचा – AI ने शोधला TB ला रोखण्याचा नवा मार्ग! CAD4TB+ प्लॅटफॉर्ममुळे मृत्यूदर कमी होणार; जाणून घ्या हे कसे काम करते
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.