Zubeen Garg CID Probe: आसामचे सांस्कृतिक आयकॉन जुबीन गर्ग यांचा 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये समुद्रात बुडून मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनानंतर, गर्ग यांच्या कुटुंबाने आसाम सीआयडीकडे तक्रार दाखल केली आहे. कुटुंबाने या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत कुटुंबातील सदस्य गर्ग यांची पत्नी गरिमा गर्ग, बहीण पाल्मे बोरठाकुर आणि मनोज कुमार बोरठाकुर यांनी तक्रार दाखल केली आहे. मनोज बोरठाकुर यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांनी ईमेलद्वारे सीआयडीकडे ही तक्रार पाठवली आहे. आम्हाला त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीची सखोल चौकशी करायची आहे.
एसआयटी तपास सुरू
सीआयडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे, जे ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजक श्यामकानु महंत, व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, आणि संगीतकार शेखर ज्योती गोस्वामी यांच्या घरांची झडती घेऊन तपास करत आहे. एसआयटीचे नेतृत्व विशेष डीजीपी एम पी गुप्ता करत आहेत. 26 सप्टेंबर रोजी सीआयडीने सिंगापूरमध्ये गर्ग यांच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या किंवा माहिती असलेल्या व्यक्तींना साक्षीदार म्हणून नोटिस बजावली आहे. त्यांना 10 दिवसांच्या आत उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
मृत्यूचे संशयास्पद घटक
सुरुवातीच्या अहवालांनुसार, गर्ग यांचा मृत्यू स्कूबा डायव्हिंग अपघातामुळे झाला असे म्हटले जात होते. तथापि, पत्नी गरिमाने यावर स्पष्ट केले की लाझारस बेटावर पोहताना झटका बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी म्हटले की, गर्ग यांच्या मृत्यूमध्ये दोष आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, आणि कोणालाही सोडले जाणार नाही. एसआयटी तपास ‘असमाधानकारक’ आढळल्यास सीबीआय चौकशीची शिफारस केली जाईल.
तपास पारदर्शक आणि सखोल असेल. राज्य सरकार कोणतीही लापरवाही सहन करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तथापी, मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करताना आयोजक श्यामकानु महंत यांना राज्याबाहेर जाण्यापासून बंदी घातली असून, तपास पूर्ण होईपर्यंत सर्व सुरक्षा उपाय प्रभावी ठेवण्यात आले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.