Dhurbe Elephant: बदला घेणारा ‘धुरबे’ हत्ती? चौदा वर्षांनंतर त्याच कुटुंबाचा माग काढत आणखी दोघांना चिरडले

या 'धुरबे' हत्तीने यापूर्वी एका दांपत्याला ठार मारले होते. आता त्याच कुटुंबातल्या आणखी दोघांचा याच हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
Dhurbe Elephant: बदला घेणारा ‘धुरबे’ हत्ती? चौदा वर्षांनंतर त्याच कुटुंबाचा माग काढत आणखी दोघांना चिरडले

Dhurbe Elephant Tracked:  एखाद्या चित्रपटातील कथेलाही मागे टाकेल अशी एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली आहे. नाग किंवा नागिणीने सूड घेतल्याच्या गोष्टी आपण आजवर अनेकदा ऐकल्या असतील, परंतु येथे एका हत्तीने एकाच कुटुंबातील सदस्यांना लक्ष्य करत तब्बल 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. या हत्तीचे नाव 'धुरबे' असून त्याने यापूर्वी एका दांपत्याला ठार मारले होते. या भीतीपोटी त्या दांपत्याच्या मुलाने आपले गाव आणि घर बदलले होते, मात्र या हत्तीने नवीन पत्ता शोधून काढत त्याच्या कुटुंबावर पुन्हा हल्ला केला. या नव्या हल्ल्यात घरातील आणखी दोघांचा मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळजनक उडाली आहे.

चौदा वर्षांपूर्वी आई-वडिलांचा घेतला बळी; आता सून आणि नातवाला संपवले
या अत्यंत दुर्दैवी घटनेतील पीडित व्यक्तीचे नाव शनिचारा असून तो नेपाळमधील जगतपूर येथे राहतो. यापूर्वी 16 डिसेंबर 2012 रोजी धुरबे हत्तीने धुमाकूळ घालत शनिचाराचे वडील बुधीराम आणि आई झरली यांना चिरडून ठार मारले होते. या भयानक घटनेनंतर हत्तीच्या भीतीने शनिचाराने आपले मूळ घर सोडले आणि रेऊ व राप्ती या नद्या पार करून तो जगतपूरच्या सुरक्षित भागात राहण्यासाठी आला. मात्र दोन दिवसांपूर्वी धुरबे हत्तीने त्याच्या या नवीन घरावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात शनिचाराची सून आशिका आणि त्याच्या अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकल्या नातवाचा जागीच मृत्यू झाला.

मृत घोषित केलेला हत्ती चार वर्षांनी पुन्हा जंगलातून बाहेर आला
धुरबे हत्तीने आजवर नेपाळमधील मानवी वस्त्यांमध्ये धुमाकूळ घालत तब्बल 25 जणांचा बळी घेतला आहे. या उपद्रवामुळे 2012 मध्ये त्याला मारण्यासाठी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, परंतु तो जखमी अवस्थेत जंगलात पळून गेला. त्याला शोधण्यासाठी वन विभागाने तब्बल 16 लाख रुपयांचा खर्च केला होता, तरीही त्याचा शोध लागला नव्हता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु सर्वांना आश्चर्याचा धक्का देत 2016 मध्ये हा हत्ती अचानक पुन्हा मानवी वस्तीत सक्रिय झाला. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार या हत्तीच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांमध्ये चितवन राष्ट्रीय उद्यानाचे सुरक्षा रक्षक आणि वन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

हेही वाचा – Village Fire : ई-बाईकच्या एका ठिणगीने पेटलं संपूर्ण गाव; 50 हून अधिक कुटुंब…

हत्तींच्या स्मरणशक्तीबाबत तज्ज्ञांनी मांडलेली निरीक्षणे
हत्ती खरोखरच माणसांचे चेहरे आणि जुन्या घटना लक्षात ठेवू शकतात का, यावर सध्या वैज्ञानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. आफ्रिकन हत्तींवर संशोधन करणाऱ्या डॉ. जॉयस पूल आणि सिंथिया मॉस यांच्या अभ्यासानुसार हत्ती अतिशय संवेदनशील आणि बुद्धिमान प्राणी असतात:
– हत्ती त्यांना ज्या ठिकाणी धोका जाणवला होता किंवा ज्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला होता, ती ठिकाणे आणि व्यक्ती दीर्घकाळ लक्षात ठेवतात.
– त्या विशिष्ट जागी पुन्हा आल्यावर त्यांच्यातील जुन्या आठवणी जागृत होतात आणि ते अधिक आक्रमक बनतात.
– हत्तींच्या कळपातील प्रमुख मादी हत्ती पाण्याचे जुने स्त्रोत, अन्नाचा शोध घेण्याचे मार्ग आणि सुरक्षित रस्ते पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवते.

ट्रॅकरच्या मदतीने हत्तीच्या हालचालींवर वन विभागाची नजर
चितवन राष्ट्रीय उद्यानाचे माहिती आणि संरक्षण अधिकारी अबिनाश थापा यांनी दिलेल्या माहितीनुसार, धुरबे हत्तीच्या वाढत्या धोक्यामुळे 2023 मध्ये त्याच्या शरीरावर एक ट्रॅकर बसवण्यात आला होता. या ट्रॅकरच्या तांत्रिक डेटाची तपासणी केली असता, हा हत्ती पीडित कुटुंबाच्या घराच्या अत्यंत जवळ वावरत असल्याचे स्पष्ट झाले. गेलाघारी बफर झोन समितीचे अध्यक्ष लाल बहादूर यांनी सांगितले की, गेल्या 9 ते 10 वर्षांपासून हा हत्ती दरवर्षी न चुकता या गावाच्या परिसरात येतो आणि शेती व घरांचे अतोनात नुकसान करतो. सध्या या हत्तीच्या वाढत्या आक्रमकतेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा – Supreme Court on Patna HC: 'न्यायाधीशांनीही थोडा अभ्यास करावा!' पाटणा हायकोर्टाच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर सुप्रीम कोर्टाने सुनावले खडे बोल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version