Indian Railway : आपण अनेकदा सायकल किंवा दुचाकी चोरीला जाऊ नये म्हणून तिला साखळीने बांधून ठेवतो. मात्र, हजारो टन वजनाची अवजड रेल्वे आणि तिचे इंजिनही साखळ्यांनी रुळाला जखडून ठेवले जाते, हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल. रेल्वेच्या या अजब वाटणाऱ्या नियमामागे प्रवाशांची सुरक्षा आणि तांत्रिक कारणे दडलेली आहेत.
ब्रिटीश काळापासूनचा 'हा' आहे नियम
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इंजिन साखळीने बांधण्याची ही प्रथा आजची नसून ब्रिटीश काळापासून चालत आली आहे. जेव्हा एखादी प्रवासी ट्रेन किंवा मालगाडी 'लूप लाईन'वर दीर्घकाळ उभी केली जाते, तेव्हा तिची पुढची आणि मागची चाके जाड लोखंडी साखळ्यांनी आणि कुलूपांनी सुरक्षित केली जातात.
ट्रेनचं इंजिन साखळीने का बांधलं जातं?
जेव्हा उभ्या असलेल्या स्थिर ट्रेनच्या शेजारून दुसरी गाडी वेगाने जाते, तेव्हा रेल्वे रुळांवर मोठी कंपने निर्माण होतात. या कंपनांमुळे स्थिर असलेल्या इंजिनची चाके पुढे-मागे सरकण्याची शक्यता असते. इंजिन अनवधानाने मागे किंवा पुढे सरकले तर मोठा अपघात होऊ शकतो. हे टाळण्यासाठी चाके साखळीने ट्रॅकला बांधली जातात. चाके केवळ साखळीनेच बांधली जात नाहीत, तर ती स्थिर राहण्यासाठी चाकाखाली लाकडी ठोकळे (Wooden Skids) देखील ठेवले जातात.
लोको पायलटची जबाबदारी
जेव्हा इंजिन बंद अवस्थेत किंवा दीर्घकाळ विश्रांतीवर असते, तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी 'लोको पायलट'ची असते. इंजिन सुरक्षितपणे लॉक झाल्याची खात्री केल्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.