बॉलीवूडची प्रसिद्ध जोडी सैफ-करीनाच्या लग्नात वेटर आणि बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करणारा एक कलाकार आज वेब विश्वाचा स्टार झाला आहे. मिर्झापूरमधील बाबर आणि पंचायतमधील फुलेराचा जावई या भूमिकांनी त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्याचा हा प्रवास खूप खडतर होता. आता तो एका रिॲलिटी शोमध्ये दिसणार असून, त्याला पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
राजस्थानमधील एका छोट्या गावातून आलेल्या आसिफ खानच्या डोक्यावरून 2008 मध्ये वडिलांचं छत्र हरपलं. घराची आर्थिक परिस्थिती बिघडल्यानं त्यानं अभ्यासासोबतच छोटी-मोठी नोकरी करायला सुरुवात केली. अभिनेता बनण्याचं स्वप्न घेऊन तो मुंबईत पोहोचला तेव्हा सुरुवातीला राहण्याची, खाण्याची चणचण उद्भवली होती. मात्र त्याने वेस्टिन हॉटेलमध्ये वेटरची नोकरी केली. जिथे त्याला रोज फक्त 225 रुपये पगार आणि एक वेळचं जेवण मिळत होतं. तो 6-7 लोकांसोबत एका चाळीतील छोट्या घरात राहत होता.
ज्या हॉटेलमध्ये आसिफ खान काम करत होता, तिथे सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नाचं भव्य रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं. किचनमध्ये भांडी साफ करताना आसिफला कळलं की बाहेर अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोणसारखे मोठे स्टार्स आले आहेत. तेव्हा तो खूप आनंदी झाला. त्यानं आपल्या मॅनेजरला विनंती केली की त्याला एक दिवसासाठी बाहेर वेटरची ड्युटी द्या जेणेकरून तो आपल्या आवडत्या स्टार्सना जवळून पाहू शकेल. पण मॅनेजरनं स्पष्ट नकार दिला. यामुळे आसिफ इतका दुःखी झाला की तो बाथरूममध्ये जाऊन बराच वेळ रडत राहिला.
पण आसिफ खानने हिम्मत हारली नाही आणि वेटरची नोकरी सोडून थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानं मिर्झापूर सिरीजमध्ये बाबरची भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. त्यांनंतर पंचायतनं तर त्याचं नशीब पूर्णपणे बदललं. त्याच्या अचूक कॉमिक टाइमिंगमुळे त्या वेब सिरीजमधील 'गजब बेइज्जती है' हा डायलॉग मिम्सच्या रूपात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. शून्यातून सुरुवात करणारा हा कलाकार आता बिग बॉस 20 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. त्यामुळे चाहते आता त्याचा गेम प्लॅन पाहण्यासाठी उत्सुक आहेत.