Mars Transit 2026 : ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या राशी परिवर्तनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पंचांगानुसार, साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध आणि भूमीचा कारक मानला जाणारा मंगळ ग्रह 21 जून 2026 रोजी दैत्यगुरू शुक्राच्या स्वामित्वाखालील वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर आपले नक्षत्र आणि राशी बदलतो, ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. मंगळाचे हे गोचर 12 राशींपैकी काही राशींसाठी अत्यंत शुभ, तर काही राशींसाठी अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात प्रामुख्याने चार राशींच्या व्यक्तींना पैशांच्या व्यवहारापासून ते कौटुंबिक नातेसंबंधांपर्यंत विविध आघाड्यांवर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मेष राशीच्या कौटुंबिक जीवनात वाढणार तणाव
मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे हे गोचर प्रामुख्याने त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यात वादळ निर्माण करू शकते. या काळात घरामध्ये विनाकारण वादविवाद आणि क्लेश वाढण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे घरातील शांतता भंग पावेल. आईच्या आरोग्याविषयीच्या चिंता अचानक वाढल्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. जर तुम्ही आधीच कोर्टकचेरी किंवा जमीन-जुमल्याच्या वादात अडकलेले असाल, तर या काळात कोर्टाच्या कामात विशेष काळजी घ्या. कोणत्याही कठीण प्रसंगात स्वतःचा संयम न गमावणे आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे हाच या काळात सर्वोत्तम मार्ग ठरेल.
कर्क राशीच्या वैवाहिक आणि व्यावसायिक भागीदारीवर नकारात्मक परिणाम
कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचे वृषभ राशीतील गोचर वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरांवर नकारात्मक परिणाम घडवून आणणारे सिद्ध होऊ शकते. विशेषतः पती-पत्नीमधील परस्पर समन्वय बिघडल्यामुळे वैवाहिक जीवनात मोठा तणाव निर्माण होण्याची आणि मतभेद टोकाला जाण्याची शक्यता आहे. जे लोक भागीदारीत म्हणजेच पार्टनरशिपमध्ये व्यवसाय चालवत आहेत, त्यांना या काळात भागीदारासोबतच्या वादामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. हा प्रतिकूल काळ शांततेने आणि संयमाने घालवणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा नातेसंबंधांमध्ये कायमची दरी निर्माण होऊ शकते.
सिंह राशीच्या व्यक्तींना करिअर आणि पैशांच्या बाबतीत सावध रहावे
मंगळाच्या या राशी परिवर्तनामुळे सिंह लोकांच्या व्यावसायिक जीवनात मोठे फेरबदल घडू शकतात. त्यांनी काही गोष्टींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या राशीच्या व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी अत्यंत सावध राहावे, कारण किरकोळ चुकीमुळे नोकरी जाण्याची किंवा अपमानाला सामोरे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सिंह राशीच्या लोकांनी या काळात कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक व्यवहार करणे पूर्णपणे टाळावे.
कन्या राशीच्या व्यक्तींनी काही बाबींवर लक्ष द्यावे; अन्यथा, मोठा फटका बसण्याची भीती
कन्या राशीच्या व्यक्तींनी करिअर, व्यावसायित जीवन आणि पैशांच्या बाबतीत विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. या राशीच्या व्यक्तींच्या व्यावसायिक जीवनात काही घडामोडी घडू शकतात. या व्यक्तींना अचानक मानसिक ताण, गोंधळ आणि मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय घेताना कन्या राशीच्या लोकांनी घाई न करता विचारपूर्वक पाऊल उचलणे आवश्यक आहे.
आरोग्याची काळजी आणि गंभीर आजारांपासून सावधानतेचा इशारा
या गोचर काळात आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांसोबतच आरोग्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. विशेषतः कन्या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याबाबत अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे, कारण या काळात गंभीर आजार उद्भवण्याचा किंवा अचानक अपघात होण्याचा मोठा धोका वर्तवण्यात आला आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मंगळ आधीच अशुभ स्थितीत आहे, त्यांनी वाहन चालवताना आणि रागावर नियंत्रण ठेवताना विशेष काळजी घ्यावी. पंचांगातील या ग्रहांच्या स्थितीनुसार सावधगिरी बाळगल्यास होणारा संभाव्य अनर्थ टाळता येणे शक्य आहे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.