US New Conditions For Iran Peace Talk: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष निवळण्यासाठी जगभरातून प्रयत्न होत असतानाच, इस्लामाबादमध्ये होणाऱ्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यातील शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, या आठवड्यात होणाऱ्या वाटाघाटींसाठी अमेरिकेने इराणसमोर दोन कडक अटी ठेवल्या आहेत. या अटींमुळे चर्चेच्या टेबलावर बसण्यापूर्वीच इराणवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थेशी बोलताना ‘आम्ही योग्य लोकांच्या संपर्कात असून लवकरच यावर तोडगा निघेल’, असा विश्वास व्यक्त केला असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होताना दिसत आहे.
होर्मुझ सामुद्रधुनी आणि इंधन संकटाचा धोका
सध्याच्या संघर्षात ‘होर्मुझ सामुद्रधुनी’ हा सर्वात कळीचा मुद्दा ठरला आहे. अमेरिकेने या सामुद्रधुनीत केलेल्या नाकेबंदीमुळे जागतिक स्तरावर इंधन आणि गॅस तुटवड्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. अमेरिकन नौदलाने होर्मुझमध्ये येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या जहाजांना रोखण्यास सुरुवात केली असून, ही नाकेबंदी पूर्णपणे उठवून मार्ग सुरक्षित आणि खुला करणे ही अमेरिकेची प्रमुख अट आहे. जोपर्यंत होर्मुझमधील वाहतुकीची सुरक्षितता निश्चित होत नाही, तोपर्यंत अमेरिका आपली भूमिका मागे घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत.
आयआरजीसीच्या संमतीची दुसरी अट
अमेरिकेने इराणसमोर ठेवलेली दुसरी अट अधिक धोरणात्मक आहे. अमेरिकेसोबत होणाऱ्या कोणत्याही संभाव्य कराराला किंवा प्रस्तावाला इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ची (IRGC) पूर्ण संमती हवी, असा आग्रह अमेरिकेने धरला आहे. तसा निर्णय घेण्यास या शिष्टमंडळातील लोक सक्षम असावेत. त्यांना तसे अधिकार दिले जावेत, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. इराणमधील अंतर्गत सत्तासंघर्ष आणि लष्करी प्रभावामुळे कोणताही करार दीर्घकाळ टिकण्यासाठी ही अट महत्त्वाची असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, इराणकडून या अटींबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा माहिती समोर आलेली नाही.
US has set Iran two conditions before reopening of talks:
-Iran must fully open the strait of Hormuz
-Iranian delegation must have authority from the IRGC to make a deal. — WarMonitor???? (@WarMonitor3) April 14, 2026
पहिली फेरी का ठरली निष्फळ?
गेल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये झालेली चर्चेची पहिली फेरी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरील वादावरून फिसकटली होती. या वाटाघाटींदरम्यान दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत इराणच्या शिष्टमंडळावर गंभीर टीका केली आहे. इराणच्या प्रतिनिधींकडे स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता नसल्याचे व्हान्स यांनी म्हटले असून, इराणमध्ये सध्या निर्णय घेण्यासाठी सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जे. डी. व्हान्स यांचा नेतृत्वावर निशाणा
व्हान्स यांच्या मते, अमेरिकेने अनेक प्रस्ताव इराणसमोर मांडले आहेत, परंतु त्यावर निर्णय घेण्यासाठी इराणच्या शिष्टमंडळाला त्यांच्या सर्वोच्च नेत्याकडून किंवा वरिष्ठ नेतृत्वाकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळणे आवश्यक आहे. जोपर्यंत इराणचे नेतृत्व अमेरिकेच्या अटी मान्य करण्याची तयारी दर्शवत नाही, तोपर्यंत ही चर्चा पुढे जाणे कठीण आहे. आता संपूर्ण जगाचे लक्ष इस्लामाबादमधील संभाव्य दुसऱ्या फेरीकडे लागले असून, इराण या अटींना कसे उत्तर देतो, यावर जागतिक शांततेचे भवितव्य अवलंबून आहे.
? WOW: JD Vance just revealed the Iranian team in Pakistan didn’t even have the AUTHORITY to make a deal. They had to go back to Tehran for approval. “That’s ultimately why we left. The delegation couldn’t close anything.” “They needed sign-off from the Supreme Leader or… pic.twitter.com/OfWkXv69FM — Your Favorite President ?? (@FavePresident) April 14, 2026
हेही वाचा – Iran-US Conflict: अमेरिकेची मोठी नाचक्की; 32 राष्ट्रांनी झिडकारला ‘होर्मुझ’ नाकेबंदीचा प्रस्ताव
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.