Goa Nightclub Fire: गोव्यातील अर्पोरा परिसरात भीषण आगीची घटना घडल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘बर्च बाय रोमियो लेन’ या नाईटक्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने लुथरा बंधूंच्या बेकायदेशीर बांधकामांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निर्देशानुसार मंगळवारी अर्पोरा किनाऱ्यावरील ‘बर्च बाय रोमियो लेन’ जवळील बांधकाम बुलडोझरने पाडण्यात आले. हे बांधकाम सरकारी जमिनीवर अनधिकृतपणे बांधण्यात आले होते. गेल्या आठवड्यातील भीषण आगीमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत आल्यानंतर त्वरित कारवाई करण्यात आली.
ब्लू कॉर्नर नोटीस जारी
यापूर्वीही वागाटोर किनाऱ्यावर लुथरा बंधूंच्या मालकीची ‘रोमियो लेन’ समुद्रकिनारी असलेली झोपडी पाडण्याचे आदेश सीएम सावंत यांनी दिले होते. जिल्हा प्रशासनाने सर्व औपचारिकता पूर्ण करत या तिसऱ्या बेकायदेशीर मालमत्तेवर कारवाई केली आहे. सौरभ आणि गौरव लुथरा हे आगीत मृत्यू झाल्यानंतर काही तासांतच थायलंडला रवाना झाले होते. दोघांवर इंटरपोलने ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले.
हेही वाचा – Wedding Accident Video : लग्न सुरु असताना अचानक कोसळलं घराचं छत, अनेक जण जखमी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, शनिवारी घडलेल्या अग्नीतांडवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा प्रशासनाने असागाव येथील समुद्रकिनारी असलेली आणखी एक झोपडी आणि संबंधित सुविधा सोमवारीच सील केल्या. तथापी, या आगीची चौकशी न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या ऐश्वर्या साळगावकर यांनी दाखल केलेल्या पीआयएलमध्ये नाईटक्लबकडे कोणताही अधिकृत बांधकाम परवाना नसतानाही ती सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाने ही याचिका 16 डिसेंबरला सुनावणीसाठी ठेवली आहे.
हेही वाचा – Jai Anmol Ambani: अंबानींच्या लेकाच्या अडचणी वाढल्या, 'या' प्रकरणी CBI कडून गुन्हा दाखल
तथापी, 7 डिसेंबरला अर्पोरा येथील नाईट क्लबमधील आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. यात बहुतांश कर्मचारी तसेच काही पर्यटकांचा समावेश होता. या घटनेनंतर राज्य सरकारकडून बेकायदेशीर संरचनांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.