PVC Aadhaar: आधार कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची आर्थिक बातमी समोर आली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) 1 जानेवारी 2026 पासून PVC आधार कार्ड (Plastic Aadhaar Card) मिळवण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ केली आहे. आता हे हाय-टेक कार्ड घरी मागवण्यासाठी नागरिकांना 75 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी हे शुल्क 50 रुपये इतके होते. वाढत्या मुद्रण खर्च आणि वितरण शुल्कामुळे हा निर्णय घेण्यात आला असून 2020 मध्ये ही सेवा सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच दरामध्ये बदल करण्यात आला आहे.
PVC आधार कार्ड का आहे खास?
हे कार्ड केवळ दिसायलाच एटीएम कार्डसारखे आकर्षक नाही, तर ते अत्यंत टिकाऊ देखील आहे. हे प्लास्टिकपासून बनवलेले असल्याने फाटत नाही आणि पाण्याने खराब होत नाही. यावर होलोग्राम, 'घोस्ट इमेज', मायक्रोटेक्स्ट आणि सुरक्षित क्यूआर (QR) कोड यांसारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. हे कार्ड तुमच्या नेहमीच्या छापील आधार पत्राप्रमाणेच सर्व सरकारी आणि खाजगी कामांसाठी कायदेशीररीत्या वैध आहे.
हेही वाचा – 'YONO' युजर्ससाठी महत्त्वाचा इशारा; आधार अपडेटच्या नावाखाली रिकामं होऊ शकतं तुमचं खातं
घरबसल्या 'असे' करा ऑनलाइन ऑर्डर
PVC आधार कार्ड मागवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून ती खालीलप्रमाणे आहे:
1. सर्वप्रथम myAadhaar पोर्टलला (myaadhaar.uidai.gov.in) भेट द्या किंवा mAadhaar ॲप उघडा.
2. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि दिलेला कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा.
3. तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
4. डॅशबोर्डवरील 'Order Aadhaar PVC Card' या पर्यायावर क्लिक करा.
5. तुमची माहिती तपासा आणि 75 रुपयांचे ऑनलाइन पेमेंट (UPI, कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे) करा.
प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक पावती मिळेल. त्यानंतर साधारण 5 कामकाजाच्या दिवसांत UIDAI हे कार्ड छापून इंडिया पोस्टकडे सोपवेल, जे तुमच्या पत्त्यावर स्पीड पोस्टने पोहोचेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.