Sanskrit Studies Begin in Pakistan: पाकिस्तानच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच एका विद्यापीठात संस्कृत भाषेचा औपचारिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) यांनी हा अभ्यासक्रम सुरू करून शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात नवा अध्याय उघडला आहे. सुरुवातीला तीन महिन्यांचा वीकेंड वर्कशॉप म्हणून सुरू झालेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर, तो आता पूर्ण चार-क्रेडिट युनिव्हर्सिटी कोर्समध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा वीकेंड वर्कशॉप विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांसाठी खुला होता. त्यांनी हेही नमूद केले की पंजाब युनिव्हर्सिटी लायब्ररीमध्ये प्राचीन संस्कृत हस्तलिखितांचा मोठा, मात्र दुर्लक्षित संग्रह उपलब्ध आहे.
स्थानिक विद्वान तयार करण्याचा प्रयत्न
अधिकाऱ्यांच्या मते, 1930 च्या दशकात विद्वान जेसीआर वूलनर यांनी अनेक संस्कृत ताडपत्रांच्या हस्तलिखितांची यादी केली होती. मात्र 1947 नंतर या संग्रहावर प्रामुख्याने परदेशी संशोधकांनीच काम केले आहे. स्थानिक विद्वानांना संस्कृतचे प्रशिक्षण दिल्यास ही परिस्थिती बदलू शकते, असे त्यांनी सांगितले. गुरमणी सेंटरचे संचालक डॉ. अली उस्मान कासमी यांनी ट्रिब्यूनशी बोलताना सांगितले की, वर्कशॉपला मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही हा अभ्यासक्रम विद्यापीठ पातळीवर सुरू करण्याचा निर्णय घेतला. सध्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित आहे, पण पुढील काही वर्षांत ती वाढेल अशी अपेक्षा आहे. 2027 च्या वसंत ऋतूपर्यंत संस्कृत हा वर्षभराचा अभ्यासक्रम म्हणून शिकवण्याचा आमचा मानस आहे.
भगवद्गीता व महाभारत अभ्यासक्रमात येणार
दरम्यान, LUMS विद्यापीठ आता भगवद्गीता आणि महाभारत यांवर आधारित स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी करत आहे. यामुळे अभ्यासाला गती मिळेल. पुढील 10-15 वर्षांत पाकिस्तानमध्येच या ग्रंथांचे अभ्यासक घडतील, असा विश्वास डॉ. कासमी यांनी व्यक्त केला. या उपक्रमाचे श्रेय लाहोरच्या फोरमन ख्रिश्चन कॉलेजमधील समाजशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शाहिद रशीद यांना दिले जाते. स्थानिक पुस्तके उपलब्ध नसल्याने त्यांनी ऑनलाइन माध्यमातून संस्कृतचे अध्ययन केले. केंब्रिजमधील संस्कृत विद्वान अँटोनिया रुपेल आणि ऑस्ट्रेलियन इंडोलॉजिस्ट मॅककोमास टेलर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा – Museum Heist : ब्रिटिश काळातील भारतीय ठेवा चोरट्यांच्या हाती; मोठी चोरी नेमकी झाली तरी कुठे?
‘संस्कृत कोणत्याही एका धर्माशी बांधील नाही’
डॉ. रशीद म्हणाले, शास्त्रीय भाषांमध्ये मानवतेसाठी अमूल्य ज्ञान आहे. मी आधी अरबी आणि फारसी शिकलो, नंतर संस्कृत. शास्त्रीय संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी साधारण एक वर्ष लागते, आणि मी आजही ते शिकत आहे. ते पुढे म्हणाले, संस्कृत ही संपूर्ण प्रदेशाला जोडणारी भाषा आहे. महान व्याकरणकार पाणिनी यांचे गाव याच भागात होते. सिंधू संस्कृतीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर लेखन झाले. संस्कृत ही एक सांस्कृतिक स्मारक आहे. ती आपलीही आहे आणि ती कोणत्याही एका धर्माशी बांधील नाही. या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये भाषिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संशोधनाला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.