Sairat Actor Arbaaj Shaikh Video Viral : प्रसिद्ध मराठी चित्रपट ‘सैराट’मध्ये ‘सल्या’ ऊर्फ सलीम शेखची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख सध्या एका अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. सोशल मीडियावर त्याचा एक हृदयद्रावक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, यामध्ये तो रडत रडत आपल्या वडिलांच्या उपचारांसाठी मदत मागताना दिसत आहे. आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या अरबाजने सुजाण नागरिकांकडे मदतीचा हात मागितला आहे. सोलापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्याच्या वडिलांवर उपचार सुरू असून तिथे त्याला अत्यंत वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले आहे.
रुग्णालयाची सक्ती आणि अवाजवी लूट
अरबाजच्या वडिलांना आधी ब्रेन हॅमरेज झाले होते, त्यामुळे त्यांना सोलापूरमधील एका रुग्णालयात 8 दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. पुढे त्यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्याने नोबेल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जिथे सुरुवातीला 10,000 रुपयांचे डिपॉझिट भरून घेण्यात आले. हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या औषधांच्या चिठ्ठ्या बाहेरून आणण्यास सक्त मनाई केली आणि केवळ त्यांच्याच मेडिकलमधून खरेदी करण्याची सक्ती केली. तीन वेळा मिळून अरबाजला तब्बल 40,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीची औषधे तिथूनच घ्यावी लागली, जी बाहेर केवळ 20,000 रुपयांत म्हणजेच अर्ध्या किमतीत उपलब्ध होती.
‘माझ्या बापाला मरताना बघायचं नाही’
रुग्णालयाकडून होणाऱ्या या उघड लूटमारीमुळे आणि मनमानी कारभारामुळे हताश झालेल्या अरबाजने तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘माझ्या बापाला मला मरताना पाहायचं नाहीये, काहीही करून त्यांना वाचवायचं आहे,’ अशा भावना त्याने डोळ्यांत अश्रू आणून व्यक्त केल्या. यापूर्वी दुसऱ्या रुग्णालयात उपचार करताना असा कोणताही कटू अनुभव आला नसल्याचे सांगत त्याने नोबेल हॉस्पिटलच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत आणि वडिलांच्या उपचारासाठी तिथून दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
गुगल पे नंबर शेअर करत मदतीचे आवाहन
सध्या प्रचंड आर्थिक विवंचनेत अडकलेल्या अरबाजने वडिलांचे उपचार सुरू ठेवण्यासाठी चाहत्यांना आणि जनतेला आर्थिक मदतीची विनंती केली आहे. त्याने यासाठी आपले Google Pay नंबर 8888515473 किंवा +91 95956 18110 जारी केले असून शक्य असेल ती मदत करण्याचे किंवा ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहन केले आहे. तुमची एक छोटीशी मदत माझ्या वडिलांचे प्राण वाचवू शकते, अशी भावनिक साद या अभिनेत्याने घातली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.