Swara Bhaskar: बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या वक्तव्यावरून अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडते. यावेळी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत चित्रपटातील जौहर प्रथेवरून तिने एका कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्त्यव्य केल्याचे समोर आले आहे. तिच्यामते जौहर प्रथा दाखवल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. यावरून अनेक आंदोलकांनी तिचा विरोध केला आहे.
1 सप्टेंबर रोजी आग्रा येथे झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व योगी युथ ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष कुंवर अजय तोमर यांनी केले. आंदोलकांनी स्वराचे पोस्टर जाळून 'पद्मावत'मधील जौहरच्या चित्रीकरणावर केलेल्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला. ऐतिहासिक परिस्थिती समजून न घेता राणी पद्मावती आणि राजपूत महिलांच्या शौर्यावर आणि त्यागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप तोमर यांनी केला आहे. तसेच या आंदोलनादरम्यान, तोमर यांनी स्वरा भास्करची जीभ कापण्यासाठी 1.51 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
या टीकेनंतर, स्वरा स्पष्टीकरण देत म्हणाली, तिने राणी पद्मावती किंवा जौहर करणाऱ्या महिलांना कधीही 'भित्रे' म्हटले नाही. परंतु अशा दृश्यांचा बलात्कार पीडितांवर वाईट परिणाम होऊ शकतो, हा मुद्दा होता.
या वादामुळे लोकांमध्ये मतभेद कायम असून, स्वराची मूळ वक्तव्ये आणि त्यानंतर तिने दिलेले स्पष्टीकरण, हे दोन्ही चर्चेचे विषय बनले आहेत.