Unemployment in India : ओडिशातील संबलपूर येथे नुकताच बेरोजगारीचे भयाण वास्तव मांडणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ 5 वी पास पात्रता असलेल्या होमगार्डच्या नोकरीसाठी उच्चशिक्षितांनी केलेली गर्दी पाहून प्रशासनाचेही डोळे पांढरे झाले आहेत.
अवघ्या 187 जागांसाठी तब्बल 8000 हून अधिक उमेदवारांनी अर्ज केल्यामुळे प्रशासनासमोर ही परीक्षा कोठे घ्यायची, असा मोठा प्रश्न उभा ठाकला होता. अखेर कोणत्याही इमारतीत ही गर्दी मावणे अशक्य असल्याने, 'जमादरपाली' एअरस्ट्रिपच्या धावपट्टीवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. उघड्या आकाशाखाली धावपट्टीवर बसून हजारो तरुणांनी हा पेपर दिला.
5वी पासच्या नोकरीसाठी इंजिनिअर्स मैदानात
या भरती प्रक्रियेतील सर्वात अस्वस्थ करणारी बाब म्हणजे या कामासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता केवळ 5 वी उत्तीर्ण अशी होती. मात्र, प्रत्यक्ष परीक्षेला आलेल्या उमेदवारांमध्ये इंजिनिअर्स, पदवीधर (Graduates) आणि पदव्युत्तर (Post-Graduates) शिक्षण घेतलेल्या तरुणांची संख्या सर्वाधिक होती. कंत्राटी पद्धतीची नोकरी असूनही, एक हक्काचा रोजगार मिळवण्यासाठी उच्चशिक्षित तरुण पहाटेपासूनच धावपट्टीवर रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हेही वाचा – Delhi Airport Incident: बापरे! दिल्ली विमानतळावर पायलटने प्रवाशाला केली जबर मारहाण; Video Viral
संबलपूरमधील एअरस्ट्रिपवर भरली 'परीक्षेची जत्रा'
उमेदवारांचा महापूर पाहता, सामान्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करणे कठीण झाले असते. म्हणूनच अधिकाऱ्यांनी मोकळ्या जागेचा पर्याय म्हणून स्थानिक एअरस्ट्रिपची निवड केली. येथे रनवेवर उमेदवारांना व्यवस्थित अंतरावर बसवून परीक्षा पार पडली. मोकळी जागा असल्यामुळे सुरक्षेचे आणि गर्दीचे नियोजन करणे पोलिसांना सोपे झाले, मात्र या दृश्यांनी देशातील रोजगाराच्या टंचाईवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
उत्तर प्रदेशातही 41 हजार पदांची मेगा भरती
ओडिशाप्रमाणेच उत्तर प्रदेशातही होमगार्ड भरतीचे वारे वाहत आहेत. तिथे तब्बल 41000 हून अधिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील भरतीसाठी किमान पात्रता 10 वी उत्तीर्ण असून उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षा (OMR), शारीरिक चाचणी (PET/PST) आणि कागदपत्र पडताळणी अशा विविध टप्प्यांतून तेथील उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
हेही वाचा – PM Narendra Modi: धुक्याचा फटका पंतप्रधानांनाही बसला, ताहरपूरला जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या हवेतच घिरट्या आणि…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.