नारळी पौर्णिमा हा श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण आणि विधी आहे. विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशात हा सण साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्रात गुरुवार, 27 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रदेवता वरुणला प्रसन्न करण्यासाठी समुद्रात नारळ टाकले जातात. हा सण कोकण आणि समुद्र किनारी राहणारे कोळी बांधवा मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नारळी पौर्णिमा प्रामुख्याने पश्चिम किनारपट्टीवरील कोळी या मच्छीमार समाजाकडून साजरी केली जाते. या दिवशी मान्सूनचे वारे हळूहळू परतायला लागतात आणि यामुळे मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मदत होते.
नारळी पौर्णिमेशी संबंधित एक आख्यायिका सांगते की, रामायण महाकाव्यात प्रभू रामांना लंकेला जाण्यास सक्षम करणारा पूल वरुणाने सांभाळून ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानण्याचा हा एक प्रकारचा विधी आहे. अशी प्रचलित समजूत आहे की, चांगली शिकार आणि सुखी आयुष्यासाठी समुद्रदेवता वरुणचा आशीर्वाद मिळावा म्हणून नारळ फेकण्याचा विधी केला जातो. वरुणाला नारळ अर्पण केला जातो. कारण पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या वस्तूंमध्ये तो सर्वात शुद्ध नैवेद्य मानला जातो. नारळातील पाणी आणि गर हे भेसळरहित मानले जातात.
नारळी पौर्णिमा 2026 निमित्त महत्त्वाच्या वेळा –
सूर्योदय – 28 ऑगस्ट, सकाळी 6.11
सूर्यास्त – 28 ऑगस्ट, सायंकाळी 6.44
पौर्णिमा तिथीची वेळ – 27 ऑगस्ट, सकाळी 9.08 ते 28 ऑगस्ट, सकाळी 9.47
नारळी पौर्णिमेचे महत्त्व –
नारळी पौर्णिमा हा किनारपट्टीच्या प्रदेशात साजरा होणारा एक प्रमुख धार्मिक सण आहे. विशेषतः महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये मच्छीमार समाजासाठी या सणाला विशेष महत्त्व आहे. नारळी पौर्णिमा हा सण मीठ उत्पादन, मासेमारी किंवा समुद्राशी संबंधित इतर कोणत्याही व्यवसायात गुंतलेल्या लोकांकडून धार्मिकरित्या साजरा केला जातो. हा सण प्रामुख्याने समुद्रदेवता वरुणच्या पूजेसाठी समर्पित आहे. मच्छीमार पावसाळ्यातील अशांत काळात समुद्राला शांत करण्याची देवाला प्रार्थना करतात आणि उपवास ठेवतात. नारळी पौर्णिमा मासेमारीच्या हंगामाची सुरुवात देखील दर्शवते आणि या दिवशी मच्छीमार समुद्रातून भरपूर मासे मिळावेत यासाठी भगवान वरुणला भरघोस नैवेद्य अर्पण करतात. नारळी पौर्णिमेचा सण येणारे वर्ष आनंद, सुख आणि समृद्धीने भरलेले असेल याचे सूचक आहे.