अमेरिका: जगभरात कोट्यवधी लोक वापरत असलेल्या सोशल मीडिया जगतातील दिग्गज कंपनी मेटाला अमेरिकेत मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या या कंपनीवर अमेरिकेतील न्यू मेक्सिको न्यायालयाने तब्बल 375 मिलियन डॉलर (सुमारे 3100 कोटी रुपये) इतका दंड ठोठावला आहे. मुलांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर बाबी लपवल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे.
अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यातील कोर्टाने मेटाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मुलांसाठी असुरक्षित ठरवले. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, कंपनीने मुलांच्या मानसिक आरोग्य आणि ऑनलाइन सुरक्षेशी संबंधित संभाव्य धोके वापरकर्त्यांपासून लपवले. नफ्याच्या हव्यासापोटी कंपनीने आवश्यक सुरक्षा उपाय आणि नियमांचे पालन केले नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
या प्रकरणात न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की मेटाच्या प्लॅटफॉर्ममुळे काही अल्पवयीन वापरकर्ते लैंगिक स्वरूपाच्या अयोग्य सामग्रीच्या संपर्कात आले तसेच ऑनलाइन लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क होण्याचा धोका वाढला. या पार्श्वभूमीवर कंपनीला मोठा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र मेटाने न्यायालयाच्या निर्णयाशी असहमती दर्शवून या निर्णयाविरोधात अपील करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
न्यू मेक्सिकोचे अटॉर्नी जनरल राउल टोरेज यांनी या निकालाला “ऐतिहासिक विजय” असे संबोधले. त्यांच्या मते, मुलांच्या सुरक्षेपेक्षा नफ्याला प्राधान्य देणाऱ्या धोरणांवर न्यायालयाने दिलेला हा स्पष्ट संदेश आहे. मेटाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्पादनांमुळे मुलांना धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव होती, तरीही त्यांनी अंतर्गत इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आणि जनतेसमोर पूर्ण सत्य मांडले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
हे प्रकरण सांताफे न्यायालयात जवळपास सहा आठवडे चालले. या सुनावणीत 40 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले, ज्यामध्ये कंपनीतील काही कर्मचारी व्हिसलब्लोअर म्हणून पुढे आले होते. तसेच शेकडो कागदपत्रे, अहवाल आणि ई-मेल्सची तपासणी करून ज्यूरीने निर्णय दिला.
या प्रकरणाची सुरुवात 2023 मध्ये झाली होती, जेव्हा अटॉर्नी जनरल राउल टोरेज यांनी मेटा आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांच्याविरोधात दावा दाखल केला. आरोप असा होता की कंपनी अल्पवयीन वापरकर्त्यांना ऑनलाइन शोषण, प्रलोभन आणि मानव तस्करीसारख्या धोक्यांपासून वाचवण्यात अपयशी ठरली आहे. अमेरिकन राज्याने या प्रकरणात तब्बल 2.2 बिलियन डॉलरपर्यंत नुकसानभरपाईची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने अंतिम निर्णयात 375 मिलियन डॉलर इतका दंड निश्चित केला आहे.
हेही वाचा: Crime News: जळालेली कार आणि कोळसा झालेला मृतदेह; माजी आमदाराच्या मुलाला निर्घृणपणे संपवलं