Kerala Accident Story : केरळमधील एका रस्ते अपघातात डॉक्टरांनी दाखवलेल्या असामान्य धैर्याची आणि प्रसंगावधानाची कथा सध्या देशभर चर्चेत आहे. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची सोय नसताना केवळ दाढी करण्याचे रेझर, प्लास्टिकचा स्ट्रॉ आणि मोबाईल टॉर्चच्या साहाय्याने रस्त्यावरच एक जटिल शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी माणुसकीचे दर्शन घडवले.
ही थरारक घटना एर्नाकुलम जिल्ह्यातील उदयमपेरूर भागात रविवारी रात्री घडली. दोन दुचाकींच्या भीषण धडकेत तीन तरुण जखमी झाले होते, त्यापैकी लिनू नावाच्या तरुणाची अवस्था अत्यंत गंभीर होती. त्याच वेळी कोट्टायम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. बी. मनूप, डॉ. थॉमस आणि त्यांच्या पत्नी डॉ.दिदिया (Dr. B. Manoop, Dr. Thomas Peter, Dr. Didia) हे वेगवेगळ्या गाड्यांनी तिथून जात होते. अपघात पाहताच हे तिघेही रुग्णवाहिकेची वाट न पाहता मदतीसाठी धावले. लिनूच्या श्वासनलिकेत रक्त साकळल्यामुळे त्याला श्वास घेणे अशक्य झाले होते आणि त्याचा जीव जाण्याची घटका जवळ आली होती.
रेझर आणि स्ट्रॉचा वापर करून सर्जरी
लिनूचा श्वास परत मिळवून देण्यासाठी डॉक्टरांनी 'क्रायकोथायरोटॉमी' (Cricothyrotomy) ही शस्त्रक्रिया तातडीने करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिथे शस्त्रक्रियेचे कोणतेही साहित्य उपलब्ध नव्हते. अशा आणीबाणीच्या प्रसंगी डॉक्टरांनी जवळच्या दुकानातून दाढी करण्याचे रेझर मागवले. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात त्यांनी लिनूच्या गळ्यावर छेद दिला. श्वासमार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी प्रथम कागदी स्ट्रॉ वापरून पाहिला, मात्र नंतर पोलिसांनी आणून दिलेल्या प्लास्टिकच्या स्ट्रॉच्या साहाय्याने ऑक्सिजनचा पुरवठा पुन्हा सुरू केला. हे सर्व ऑपरेशन थिएटरऐवजी भररस्त्यात पार पडले.
हेही वाचा – ACB Action : पगार 1 लाख, संपत्ती 100 कोटी! तेलंगणा उपपरिवहन आयुक्ताच्या 'छुप्या साम्राज्या'चा पर्दाफाश
लोकांचे सहकार्य आणि गोपनीयता
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आजूबाजूला जमलेल्या नागरिकांनीही मोठी सामाजिक जाणीव दाखवली. डॉक्टरांनी विनंती करताच कोणीही या शस्त्रक्रियेचे व्हिडिओ किंवा फोटो काढले नाहीत, उलट अनेकांनी आपापल्या मोबाईलचे टॉर्च धरून डॉक्टरांना प्रकाश मिळवून दिला. डॉक्टरांच्या या धाडसी प्रयत्नांमुळे लिनूला प्राथमिक जीवदान मिळाले आणि त्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीतही डगमगून न जाता उपचार करण्याच्या त्यांच्या या वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्यपालांकडून कौतुक आणि दुर्दैवी अंत
केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर (Kerala Governor Rajendra Vishwanath Arlekar) यांनी स्वतः या डॉक्टरांना फोन करून त्यांच्या अतुलनीय कामाची दखल घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले. दुर्दैवाने, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही लिनूचा दोन दिवसांनंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, लिनूचा जीव वाचवण्यासाठी त्या रात्री डॉक्टरांनी जे प्रयत्न केले, ते वैद्यकीय क्षेत्रातील 'प्रसंगावधान' आणि 'कर्तव्य' याचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.
हेही वाचा – Nitin Gadkari : 'दिल्लीत 3 दिवस राहिलो तरी मला अॅलर्जी..'; प्रदूषणावर नितीन गडकरींचे रोखठोक भाष्य
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.