Jitendra Singh Offer to Cockroach Janta Party: NEET परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीत गेल्या महिन्यापासून 'कॉक्रोच जनता पार्टी'चे आंदोलन पेटले आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक हे देखील बेमुदत उपोषणाला बसले होते. प्रकृती बिघडल्यामुळे पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असले, तरी त्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतलेले नाही. सोमवारी आंदोलकांनी संसदेवर काढलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी लाठीमार करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे दिल्लीत मोठा गोंधळ उडाला होता. या लाठीमारानंतर विरोधकांसह देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, विद्यार्थी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
सरकारकडून चर्चेची नवी ऑफर
आंदोलन अधिक चिघळत चालल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता संवाद साधून तोडगा काढण्याची भूमिका घेतली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी यावर भाष्य करताना स्पष्ट केले की, सरकार विद्यार्थ्यांच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास पूर्णपणे तयार आहे. केंद्र सरकारच्या वतीने बुधवारी दुपारपासून कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी तब्बल 4 वेळा अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले असून, निमंत्रण देऊनही समोरून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत चर्चेची तयारी
तरुण आंदोलकांना आवाहन करताना जितेंद्र सिंह म्हणाले की, विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी चर्चेसाठी येऊ शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या कार्यालयात किंवा निवासस्थानी ही बैठक आयोजित केली जाऊ शकते. 'या चर्चेला मी स्वतः आणि जे. पी. नड्डा उपस्थित राहू. कोणत्याही समस्येवर संवादातूनच मार्ग निघू शकतो, त्यामुळे तरुण मित्रांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चेच्या टेबलावर यावे,' अशी आग्रही विनंती त्यांनी केली. याआधी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती, मात्र त्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नव्हता.
तोडग्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा
एकीकडे पोलीस कारवाईमुळे उफाळलेला रोष आणि दुसरीकडे सरकारकडून दिलेले चर्चेचे निमंत्रण, अशा दुहेरी वळणावर हे आंदोलन पोहोचले आहे. कॉक्रोच जनता पार्टीने आपल्या मागण्यांवरून माघार घेतलेली नसली, तरी केंद्र सरकारच्या 4 वेळा पाठवलेल्या या प्रस्तावानंतर विद्यार्थी संघटना चर्चेसाठी पुढे येते की आंदोलन अधिक तीव्र करते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.