Iran threat to open hell gates for US : आखाती देशांमधील तणाव आता टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला 10 दिवसांचा अल्टिमेटम आता केवळ 48 तासांवर येऊन ठेपला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी किंवा शांतता करारासाठी ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वरून ही अंतिम चेतावणी दिली आहे. जर विहित वेळेत इराणने पावले उचलली नाहीत, तर तिथल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा जमीनदोस्त करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. मात्र, इराणने ही धमकी केवळ धुडकावून लावली नाही, तर अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
'नरकाचे दरवाजे उघडतील'; इराणचा थेट इशारा
इराणच्या सेंट्रल मिलिट्री कमांडने ट्रम्प यांची 48 तासांची मुदत कचऱ्याच्या पेटीत फेकली आहे. 'खतम अल-अंबिया' केंद्रीय मुख्यालयातून जनरल अली अब्दुल्लाही अलीबादी यांनी अमेरिकेला उलट धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले की, ट्रम्प यांची ही कृती "असहाय्य, घाबरलेली आणि मूर्खपणाची" आहे. जर अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याचे धाडस केले, तर त्यांच्यासाठी प्रत्यक्ष "नरकाचे दरवाजे उघडले जातील," असा इशारा इराणने दिला आहे. ट्रम्प यांच्या दबावाखाली इराण झुकणार नाही, हेच या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
बुशहर अणुऊर्जा केंद्रावर हल्ला आणि अणुयुद्धाचा धोका
दरम्यान, इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या बुशहर अणुऊर्जा केंद्रावर सलग 4 थ्यांदा मोठा हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर इराणने पहिल्यांदाच उघडपणे अणुयुद्धाचा धोका बोलून दाखवला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अत्यंत गंभीर विधान केले असून, त्यांच्या मते परिस्थिती आता हाताबाहेर जात आहे. या हल्ल्यांमुळे जर किरणोत्सर्गाचा प्रसार (Radioactive Fallout) झाला, तर त्याचा परिणाम केवळ इराणपुरता मर्यादित राहणार नाही.
आखाती देशांमध्ये घबराट; GCC राष्ट्रांनाही फटका?
परराष्ट्र मंत्री अराघची यांनी स्पष्ट केले की, अणुऊर्जा केंद्रावरील हल्ल्यांमुळे उद्भवणारे संकट संपूर्ण आखाती प्रदेशाला गिळंकृत करू शकते. जर किरणोत्सर्गी ढग पसरले, तर सौदी अरब, यूएई, कुवैत, बहरीन, कतार आणि ओमान यांसारख्या GCC (Gulf Cooperation Council) देशांमधील जनजीवन पूर्णपणे नष्ट होईल. इराणच्या या दाव्याने संपूर्ण मध्यपूर्वेत खळबळ उडाली असून, शेजारील देशही आता दहशतीखाली आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.