India-Russia Vision 2030: भारत आणि रशियामध्ये आर्थिक संबंधांना नवी दिशा देणारा महत्त्वाचा करार मंगळवारी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर दोन्ही देशांनी 2030 पर्यंत आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी ‘व्हिजन 2030’ दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. या करारामुळे आगामी वर्षांत व्यापार, गुंतवणूक, सह-उत्पादन आणि नवउद्योजकतेच्या संधींमध्ये मोठी वाढ होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
रणनीतिक भागीदारीत नवी भर
द्विपक्षीय बैठकीनंतर बोलताना मोदी म्हणाले, 'राष्ट्रपती पुतिन हे आमच्या दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीचे शिल्पकार आहेत. 23 व्या भारत-रशिया शिखर परिषदेत त्यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. आज स्वाक्षरी केलेला ‘व्हिजन 2030’ दस्तऐवज दोन्ही देशांच्या आर्थिक सहकार्यास नवी ऊर्जा देईल.' दोन्ही नेते भारत-रशिया व्यवसाय मंचातही सहभागी होणार असून, या व्यासपीठातून उद्योगजगतामध्ये नवीन संधी निर्माण होतील, असेही मोदी यांनी सांगितले. युरेशियन आर्थिक संघासोबत मुक्त व्यापार करार (FTA) साध्य करण्यासाठीही दोन्ही देशांनी नवे पाऊल टाकल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा – Putin in India: भारत दौऱ्यावर पुतीन यांचे विशेष विमान; त्यावरील 'Poccия' या शब्दाचा अर्थ काय?
रशियन पर्यटकांसाठी मोठी घोषणा
या बैठकीदरम्यान भारताने रशियन नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच रशियन पर्यटकांना भारतात येण्यासाठी 30 दिवसांचा मोफत ई-टूरिस्ट व्हिसा आणि गटाने प्रवास करणाऱ्यांसाठी 30 दिवसांचा ग्रुप टुरिस्ट व्हिसा उपलब्ध होणार आहे. दोन्ही देशांमध्ये मनुष्यबळ आणि पर्यटनाचा प्रवाह वाढवण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरेल, असे मोदींनी सांगितले.
युक्रेन संघर्षावर भारताची भूमिका स्पष्ट
रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताच्या भूमिकेवरही मोदी यांनी भाष्य केले. 'भारताने सुरुवातीपासूनच शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. संघर्षाच्या दीर्घकालीन, टिकाऊ समाधानासाठी होणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाचे आम्ही स्वागत करतो. भारत भविष्यातही शांततेसाठी आपले योगदान देत राहील, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.