Google Earthquake Alert Venezuela : बुधवारी व्हेनेझुएलामध्ये 7.1 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ दोन प्रलयंकारी भूकंप झाले, ज्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा व्हेनेझुएला या देशातील गेल्या 100 वर्षांतील सर्वात शक्तिशाली आणि शतकातील दोन सर्वात भयानक भूकंप ठरला आहे. मात्र, या प्रलयंकारी आपत्तीदरम्यान स्मार्टफोनमधील एका अपग्रेड तंत्रज्ञानामुळे हजारो लोकांचे प्राण कसे वाचू शकतात, याचे एक अद्भूत उदाहरण पाहायला मिळाले. जमीन प्रत्यक्षात हादरण्यापूर्वीच गुगलने आपल्या अपग्रेड अँड्रॉइड तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या मोबाईलवर इमर्जन्सी मेसेज पाठवले होते. विनाशकारी धक्के पोहोचण्यापूर्वी मिळालेल्या या काही सेकंदांच्या अलर्टमुळे नागरिकांना सुरक्षित स्थानी जाण्यासाठी मोलाचा वेळ मिळाला.
341 किमी अंतरावरून मिळाला होता अलर्ट
या घटनेदरम्यान व्हेनेझुएलातील 6.2 तीव्रतेच्या एका भूकंपाचा गुगल अलर्ट तब्बल 341 km अंतरावरून जमीन हादरण्यापूर्वीच युजर्सना मिळाला होता, ज्याचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अँड्रॉइड स्मार्टफोनमधील अपग्रेड सेन्सर्स (Accelerometers) हे मिनी-सिस्मोमीटर म्हणून काम करतात आणि भूकंप लहरींची माहिती अत्यंत वेगाने गोळा करतात. यामुळेच प्रत्यक्ष पडझड होण्यापूर्वी गुगलची ही सिस्टीम भूकंपाची तीव्रता आधीच ओळखून युजर्सना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी मोलाचा वेळ मिळवून देते.
भूकंप लहरींपेक्षाही वेगवान ठरला अँड्रॉइड फोन
भूकंप प्रत्यक्ष जाणवण्यापूर्वीच गुगल अलर्ट कसा पाठवते, याचे गणित भूकंपाच्या लहरींच्या वेगावर अवलंबून आहे. भूकंपामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या लहरी असतात:
प्रायमरी लहरी (P-Waves): या लहरी अत्यंत वेगवान असतात आणि साधारणपणे 6 km प्रति सेकंद या वेगाने प्रवास करतात. मात्र, त्यांची तीव्रता कमी असल्याने त्यांचे धक्के फारसे जाणवत नाहीत.
सेकंडरी लहरी (S-Waves): या लहरींचा वेग सुमारे 3 to 4 km प्रति सेकंद असतो. हा वेग कमी असला, तरी या लहरी अत्यंत शक्तिशाली असतात आणि भूकंपातील खरी पडझड व मोठे नुकसान याच लहरींमुळे होते.
अँड्रॉइड फोनमधील सेन्सर्स वेगाने येणाऱ्या याच प्राथमिक लहरी (P-waves) आधीच ओळखतात. या लहरींचा डेटा प्रकाशाच्या वेगाने गुगलच्या सर्व्हरपर्यंत पोहोचतो आणि विनाशकारी 'एस-वेव्ह्स' लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच गुगल मोबाईलवर अलर्ट पाठवते. यामुळेच तुमचा फोन भूकंपाच्या विनाशकारी धक्क्यांपेक्षाही वेगवान ठरतो.
स्मार्टफोन बनला 'मिनी-सिस्मोमीटर'
आजच्या प्रत्येक मॉडर्न स्मार्टफोनमध्ये 'ॲक्सलेरोमीटर' (Accelerometer) नावाचा सेन्सर असतो. साधारणपणे, जेव्हा तुम्ही फोन आडवा करता तेव्हा स्क्रीन ऑटोमॅटिक फिरवण्यासाठी (Screen Rotation) हा सेन्सर काम करतो. पण याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे हा सेन्सर जमिनीतील अत्यंत सूक्ष्म कंपने ओळखून ती मोजू शकतो. जेव्हा एखादा स्मार्टफोन भूकंपाची तीव्र कंपने ओळखतो, तेव्हा तो तात्काळ 'अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट सिस्टीम'ला एक सिग्नल आणि त्या भागाचे अंदाजित लोकेशन गुगलला पाठवतो.
जगातील सर्वात मोठे भूकंप शोधणारे नेटवर्क
सिग्नल मिळाल्यानंतर गुगलचे सर्व्हर त्या परिसरातील अनेक स्मार्टफोनवरून आलेली माहिती एकत्र करतात आणि तिथे खरोखरच भूकंप येत आहे का, याची पडताळणी करतात. एका फोनने सिग्नल पाठवल्यानंतर गुगल आजूबाजूच्या इतर फोनचा डेटा तपासते. जर एकाच वेळी अनेक फोनमध्ये सारखीच कंपने जाणवली, तर गुगलला खात्री पटते की भूकंप येत आहे आणि त्यानुसार यंत्रणा तात्काळ अलर्ट जारी करते. गुगलकडे या नेटवर्कचा भाग असलेले तब्बल 2 अब्जांहून अधिक अँड्रॉइड फोन्स आहेत. यामुळेच गुगलची ही सिस्टीम जगातील सर्वात मोठे 'डिस्ट्रिब्युटेड सिस्मोग्राफ' म्हणजेच जगातील सर्वात मोठे भूकंप शोधणारे नेटवर्क बनली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.