जळगाव: केंद्र सरकारने मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्यानंतर देशभरातील सराफा बाजारात खळबळ उडाली असून त्याचे तीव्र पडसाद जळगावच्या सुवर्ण बाजारातही उमटले आहेत. ‘सुवर्णनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्ये एका दिवसात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली असून सराफा बाजारात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंवर 15 टक्के आयात शुल्क लागू केले आहे. या निर्णयानंतर जळगावातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 12 हजार रुपयांची वाढ झाली. तर चांदीच्या दरात एकाच दिवसात सुमारे 30 हजार रुपयांची उसळी पाहायला मिळाली.
सध्या जळगाव बाजारात जीएसटीसह 10 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल 1 लाख 62 हजार रुपयांवर पोहोचला आहे. त्याचवेळी चांदीचे दरही झपाट्याने वाढत असून जीएसटीसह एक किलो चांदीसाठी ग्राहकांना जवळपास 2 लाख 98 हजार रुपये मोजावे लागत आहेत. या विक्रमी दरवाढीमुळे लग्नसराईत खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.
सराफा व्यावसायिकांच्या मते, आयात शुल्क वाढल्यामुळे परदेशातून सोने-चांदी आणणे महाग झाले असून त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. तसेच जागतिक स्तरावरील आर्थिक अस्थिरता, मध्यपूर्वेतील तणाव आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यामुळेही दर वाढण्यास हातभार लागत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आगामी काळातही सोन्या-चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता असली तरी सामान्य ग्राहक मात्र खरेदीपासून दूर राहत असल्याचे चित्र आहे.
नेहमी ग्राहकांनी गजबजलेला जळगावचा सुवर्ण बाजार आज तुलनेने शांत दिसून आला. वाढत्या दरांमुळे अनेकांनी खरेदी पुढे ढकलल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आगामी काही दिवसांत बाजारातील परिस्थिती आणखी बदलू शकते, त्यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष आता केंद्र सरकारच्या पुढील निर्णयांकडे लागले आहे.