सोशल मीडिया हा आजच्या डिजिटल जगाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. मात्र लहान मुलांचा सोशल मीडियावरील वाढता वापर, ऑनलाइन छळ, अनोळखी व्यक्तींकडून होणारा संपर्क आणि व्यसनाधीन करणाऱ्या फीचर्सबाबत जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर युरोपियन युनियनने मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी EU KIDS Actचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावात वयानुसार सोशल मीडिया वापरावर वेगवेगळ्या पातळ्यांवर निर्बंध सुचवण्यात आले आहेत.
13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया अकाउंट नाही
प्रस्तावानुसार 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया आणि संबंधित व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्मवर स्वतंत्र अकाउंट तयार करता येणार नाही. मात्र विशेषतः लहान मुलांसाठी तयार केलेल्या काही व्हिडिओ सेवांचा पालकांच्या अकाउंटद्वारे मर्यादित वापर करण्याची शक्यता ठेवण्यात आली आहे. त्यावर पालकांचे नियंत्रण असेल.
13 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी पालकांची देखरेख
13 ते 15 वर्षांच्या किशोरवयीनांसाठी पूर्णपणे स्वतंत्र सोशल मीडिया अकाउंटऐवजी मर्यादित ‘मिनी अकाउंट’ची तरतूद करण्यात आली आहे. हे अकाउंट पालकांच्या नियंत्रणाखाली असेल. दररोजच्या वापरासाठी जास्तीत जास्त एक तासाची मर्यादा, संपर्क कोणाशी ठेवायचा यावर पालकांची मंजुरी आणि काही फीचर्सवर निर्बंध अशा तरतुदी प्रस्तावात आहेत
15 वर्षांनंतर मुलांना स्वतंत्र अकाउंट तयार करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र अशा वेळीही प्लॅटफॉर्मने मुलांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक असेल.
फक्त वयाची मर्यादा नाही, प्लॅटफॉर्मच्या डिझाइनवरही लक्ष
EU KIDS Actमध्ये केवळ सोशल मीडिया वापराचं वय निश्चित करण्यावर भर नाही. मुलांना आकर्षित करून त्यांचा स्क्रीन टाइम वाढवणाऱ्या काही फीचर्सवरही नियम आणण्याचा प्रस्ताव आहे.
यामध्ये इनफिनिट स्क्रोलिंग, झोपेच्या वेळेतील पुश नोटिफिकेशन आणि मुलांसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या शिफारस अल्गोरिदमवर निर्बंध यांचा समावेश आहे. मुलांची प्रोफाइल सुरुवातीपासून खासगी ठेवण्याची आणि अनोळखी व्यक्तींकडून संपर्काचा धोका कमी करण्याचीही तरतूद आहे
वयाची पडताळणी कशी होणार?
नव्या नियमांमध्ये सोशल मीडिया अकाउंट तयार करणाऱ्या वापरकर्त्याचं वय तपासण्याची जबाबदारी प्लॅटफॉर्मवर टाकण्यात येणार आहे. त्यासाठी सुरक्षित आणि गोपनीयता जपणाऱ्या वय-पडताळणी प्रणालीचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. विद्यमान अकाउंट्सचीही नियम लागू झाल्यानंतर तपासणी होऊ शकते.
AI चॅटबॉट्सवरही नियम
या प्रस्तावाचा आवाका केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित नाही. ऑनलाइन गेम्स, व्हिडिओ प्लॅटफॉर्म, अॅप स्टोअर्स आणि मुलांसाठी उपलब्ध AI चॅटबॉट्सवरही काही सुरक्षा नियम लागू करण्याचा प्रस्ताव आहे. विशेषतः AI चॅटबॉट्सनी मुलांमध्ये भावनिक अवलंबित्व निर्माण करणाऱ्या पद्धतीने काम करू नये, यासाठीही नियम सुचवण्यात आले आहेत.
नियम मोडल्यास मोठा दंड
मोठ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मना मुलांच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करण्याची जबाबदारी अधिक कठोरपणे देण्यात आली आहे. प्रस्तावानुसार उल्लंघन झाल्यास जागतिक वार्षिक उलाढालीच्या 6 टक्क्यांपर्यंत दंड होऊ शकतो. मात्र EU KIDS Act सध्या प्रस्तावाच्या टप्प्यात असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि मंजुरीनंतरच त्याची अंमलबजावणी होईल.
युरोपियन युनियनच्या या प्रस्तावामुळे मुलांच्या डिजिटल वापरात वयानुसार वेगवेगळे नियम लागू करण्याच्या चर्चेला वेग आला आहे. सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच प्लॅटफॉर्मची रचना मुलांसाठी अधिक सुरक्षित करण्यावर या प्रस्तावाचा भर आहे.