ED Raid on YouTuber : मनी लाँडरिंगच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील रहिवासी आणि प्रसिद्ध युट्यूबर अनुराग द्विवेदी याच्या घरावर मोठी कारवाई केली आहे. ऑनलाइन बेटिंग ॲपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे अफाट संपत्ती जमा केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या छापेमारीदरम्यान ईडीच्या पथकाला त्याच्या निवासस्थानी एकापेक्षा एक सरस अशा आलिशान गाड्यांचा ताफा पाहायला मिळाला, ज्यामुळे अधिकारीही थक्क झाले.
आलिशान गाड्यांची जप्ती आणि दुबईतील गुंतवणूक
छापेमारीत ईडीने अनुराग द्विवेदी याच्याकडील अत्यंत महागड्या कार जप्त केल्या आहेत. यामध्ये लॅम्बोर्गिनी उरुस, BMW Z4, मर्सिडीज बेंझ या गाड्यांचा समावेश आहे.
महिंद्रा थार केवळ भारतातच नव्हे, तर या युट्यूबरने दुबईमध्येही मोठी गुंतवणूक करून मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या पैशातून त्याने अशा प्रकारे स्वतःचे शौक पूर्ण करण्यासाठी महागड्या वस्तू खरेदी केल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सिलिगुडी कनेक्शन आणि अटकेची कारवाई
या प्रकरणाचे धागेदोरे पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथील एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाशी जोडले गेले आहेत. बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग ॲप चालवून पैसे कमावणाऱ्या सोनू कुमार ठाकूर आणि विशाल भारद्वाज या दोघांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. या दोघांच्या चौकशीतून आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासातून अनुराग द्विवेदी याचे नाव समोर आले. त्यानंतर ईडीने द्विवेदीच्या बँक खात्यांची आणि मालमत्तेची बारकाईने तपासणी करून त्याच्या घरावर छापा टाकण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – India School: देशात 5149 सरकारी शाळा विद्यार्थ्यांविना; शिक्षणव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह
ऑनलाइन बेटिंगचे प्रमोशन आणि पैशांची अफरातफर
अनुराग द्विवेदी हा आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून 'स्काय एक्सचेंज' सारख्या ऑनलाइन बेटिंग ॲपचे मोठ्या प्रमाणावर प्रमोशन करत असे. भारतात ऑनलाइन सट्टेबाजीवर बंदी असतानाही, त्याने व्हिडिओ बनवून लोकांमध्ये याचा प्रचार केला आणि त्या बदल्यात मोठी रक्कम मिळवली. सट्टेबाजीच्या माध्यमातून येणारा हा पैसा तो स्वतःच्या कंपनीच्या आणि नातेवाईकांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात जमा करत असे. या पैशांचा कोणताही अधिकृत स्रोत किंवा हिशेब तो देऊ शकला नाही, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.
बेकायदेशीर संपत्तीवर टाच
तपासादरम्यान असे दिसून आले की, द्विवेदीने बेकायदेशीर मार्गाने कमावलेला पैसा पांढरा करण्यासाठी विविध क्लिष्ट मार्गांचा अवलंब केला होता. जप्त करण्यात आलेल्या गाड्या आणि दुबईतील मालमत्तेची कागदपत्रे आता या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे ठरणार आहेत. ऑनलाइन सट्टेबाजीच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या आणि त्यातून स्वतःची श्रीमंती वाढवणाऱ्या अशा बेकायदेशीर कृत्यांवर ईडीने आता कठोर भूमिका घेतली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.