RBI Sachet Portal: डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. UPI, नेटबँकिंग आणि कार्ड पेमेंट्समुळे सोय झाली असली, तरी आर्थिक फसवणुकीच्या घटनाही झपाट्याने वाढल्या आहेत. अनेक लोक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरत असून, बनावट गुंतवणूक योजना, फसवे कर्ज प्रस्ताव आणि अनधिकृत वित्तीय कंपन्यांमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे. अशा प्रसंगी घाबरण्याची गरज नाही. कारण, आता तुम्ही रिझर्व्ह बँकेने (RBI) नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेल्या “सचेत पोर्टल” (https://sachet.rbi.org.in) वर तक्रार नोंदवू शकता.
हेही वाचा – Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये वाढ; दिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांमधील दर काय? वाचा
‘सचेत पोर्टल’ म्हणजे काय?
‘सचेत’ हे रिझर्व्ह बँकेचे अधिकृत ऑनलाइन व्यासपीठ आहे, जे फसव्या गुंतवणूक योजनांविरुद्ध तक्रारी नोंदवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर नागरिक पुढील प्रकारच्या तक्रारी करू शकतात;
– अनधिकृत चिट फंड आणि फसवे गुंतवणूक प्रस्ताव
– परवान्याशिवाय चालवले जाणारे वित्तीय व्यवसाय
– बेकायदेशीर ठेव योजना
– अवास्तव परतावा देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या कंपन्या
तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया
सचेत पोर्टलच्या वेबसाइटला भेट द्या – https://sachet.rbi.org.in
“Lodge Complaint” या पर्यायावर क्लिक करा.
संबंधित कंपनीचे नाव, योजनेचे तपशील आणि तुमच्या गुंतवणुकीची माहिती भरा.
तक्रार सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक Reference Number मिळेल. याचा वापर करून तक्रारीची स्थिती तुम्ही पुढे ट्रॅक करू शकता.
जर तुम्हाला कोणत्या नियामकाच्या अंतर्गत तक्रार येते हे माहित नसेल, तर “Unable to find Regulator” या पर्यायावर क्लिक करा. RBI ची SLOCC टीम तुमची तक्रार योग्य विभागाकडे पाठवेल. तुमचा मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे, कारण SMS द्वारे तक्रार क्रमांक आणि पुढील अपडेट्स मिळतात.
सायबर फसवणुकीसाठी तातडीची कारवाई
जर तुम्ही ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचा बळी ठरलात, तर ताबडतोब टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक 1930 वर कॉल करा किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल https://www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. तसेच दूरसंचार विभागाच्या “चक्षु” पोर्टलवरही फसवे कॉल्स आणि मेसेजेसची तक्रार करता येते.
हेही वाचा – Aadhaar ATM: आधार एटीएम म्हणजे काय? तुमचे वॉलेट हरवल्यास पैसे काढण्यासाठी त्याचा कसा वापर करावा?
सतर्क रहा, सुरक्षित रहा
डिजिटल व्यवहार करताना कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी किंवा अज्ञात अॅप डाउनलोड करण्यापूर्वी दोनदा विचार करा. अनोळखी व्यक्तींना OTP, कार्ड डिटेल्स किंवा UPI PIN कधीही देऊ नका.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.