दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०० कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी करणारी मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत दोघांनी बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी, संबंधित विधाने मागे घ्यावीत आणि सात दिवसांच्या आत उत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सतीश सालियन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणात नव्याने चौकशी व्हावी, यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना काही सार्वजनिक विधानांमधून राजकीय हेतू असल्याचे चित्र उभे करण्यात आले. या विधानांमुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा आरोप करत त्यांनी मानहानीची कारवाई सुरू केली आहे.
नोटिशीत आदित्य ठाकरे यांनी केलेल्या काही कथित वक्तव्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही अशाच भूमिकेचे समर्थन केल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे.
बिनशर्त माफीची मागणी
भरपाईच्या मागणीसोबतच सतीश सालियन यांनी दोन्ही नेत्यांकडून "बिनशर्त, स्पष्ट आणि लेखी सार्वजनिक माफी" मागितली आहे. ही माफी प्रमुख वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि डिजिटल माध्यमांवर प्रसिद्ध करावी, अशी मागणीही नोटिशीत करण्यात आली आहे. याशिवाय किमान तीन मिनिटांचा व्हिडिओ संदेश संबंधित नेत्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवर प्रसिद्ध करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
CBI तपासाच्या पार्श्वभूमीवर घडामोड
ही कायदेशीर कारवाई अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा दिशा सालियन प्रकरणात CBIने नव्याने FIR नोंदवून तपास सुरू केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणातील तपासाला नवे वळण मिळाले असून, विविध बाबींची पुन्हा तपासणी केली जात आहे.
आदित्य ठाकरेंची भूमिका
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी दिशा सालियन यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यांनी हे आरोप पुराव्याविना आणि राजकीय हेतूने केले जात असल्याचा दावा केला आहे.
प्रकरण पुन्हा चर्चेत
२०२० मध्ये दिशा सालियन यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण देशभर चर्चेत आले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी CBIच्या तपासामुळे आणि आता आलेल्या ५०० कोटींच्या कायदेशीर नोटिशीमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. पुढील काही दिवसांत या नोटिशीला संबंधितांकडून काय उत्तर दिले जाते आणि CBI तपासात कोणत्या नव्या घडामोडी समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.