बॉलीवूडमधील बाजीराव-मस्तानी जोडी यांनी आज सोशल मीडियावर नुकतीच एक हृदयस्पर्शी पोस्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. त्यात काही खासगी कृष्णधवल छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यांचे पहिले अपत्य दुआच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त हे फोटो समोर आले आहेत, ज्यामुळे कुटुंबाची ही एकत्र झलक अधिकच विशेष ठरली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याने दुआसोबतच्या एका कोलॅब इंस्टाग्राम पोस्टद्वारे त्यांच्या दुसऱ्या गरोदरपणाची घोषणा केली होती. त्या फोटोमध्ये, दुआच्या हातात दोन गुलाबी रेषा असलेली प्रेग्नन्सी टेस्ट दिसली होती. आजच्या पोस्टमध्ये दीपिकाचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसत असून, तिने प्रेग्नन्सी ग्लो आणि कुटुंबासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
दीपिका-रणवीरचे दुआसोबतचे प्रेग्नन्सी फोटोशूट
एका फोटोमध्ये, रणवीर दीपिकाच्या जवळ उभा असून, त्याने हळुवारपणे तिच्या बेबी बंपला धरले आहे आणि एकमेकांना बघून स्मितहास्य करत आहेत. दीपिकाने फिटिंगचा लेसचा ड्रेस घातला आहे, ज्यामुळे तिचे वाढणारे पोट उठून दिसत आहे, तर रणवीरने पांढरा शर्ट आणि पॅन्ट घालून साधा लूक ठेवला आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये त्यांची मुलगी दुआ दिसत आहे. ती चिमुकली तिच्या आई-वडिलांच्या मध्ये उभी आहे आणि खोडकरपणे आपला चेहरा लपवत आहे, तर दीपिका आणि रणवीर तिच्या बाजूला बसले आहेत. या जोडप्याने दुआला शक्यतोवर लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले आहे, त्यामुळे कुटुंबाची ही एकत्र असलेली एक दुर्मिळ आणि हृदयस्पर्शी झलक आहे.
कुटुंबाबरोबर करिअरकडे दुर्लक्ष नाही-
आपल्या दुसऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी करत असताना, दीपिकाने तिची कामाची वचनबद्धता कायम ठेवली आहे. ती पुढे सिद्धार्थ आनंदच्या ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यात शाहरुख खान आणि सुहाना खान मुख्य भूमिकेत आहेत. तसेच अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असणाऱ्या जवान चित्रपट दिग्दर्शित अटलीच्या साय-फाय ॲक्शन चित्रपट ‘राका’ चाही एक भाग आहे. दरम्यान, रणवीरने ‘प्रलय’ च्या कामाला सुरुवात केली असून तो सध्या मुंबईत या प्रोजेक्टचे चित्रीकरण करत आहे