Sheikh Hasina Controversy: बांगलादेशमधील राजकारणात खळबळ उडवणारा मोठा आरोप समोर आला आहे. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) सोमवारी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील गंभीर प्रकरणांवर प्राथमिक निकाल देताना धक्कादायक निरीक्षणे नोंदवली. तपास पथकाच्या अहवालातील महत्त्वाच्या नोंदींचा उल्लेख करत न्यायाधीशांनी म्हटले की शेख हसीना यांनी टेलिफोनवरून आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी हेलिकॉप्टर, तसेच जीवघेणी शस्त्रे वापरण्याचे आदेश दिले होते.
माजी महापौर तापोश यांच्याशी कथित संभाषणाचा उल्लेख
न्यायालयानुसार, तपास अहवालात शेख हसीना आणि दक्षिण ढाका महानगरपालिकेचे माजी महापौर शेख फजले नूर तापोश यांच्यातील टेलिफोनिक संभाषणाचे उल्लेख आहेत. या कॉलमध्ये आंदोलकांना चिरडण्यासाठी “कठोर पावले उचला” असा आदेश दिल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
आयसीटीचे कठोर निरीक्षण
आयसीटीच्या म्हणण्यानुसार, तपास यंत्रणेने घटनांची व्यापक चौकशी केली असून अनेक प्रत्यक्षदर्शी आणि अधिकृत साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. अहवालात म्हटले आहे की, “कारवाईचा उद्देश कायदा-सुव्यवस्था राखण्याचा होता, पण प्रत्यक्षात अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण गेले. त्यामुळे हे कृत्य मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या श्रेणीत मोडते.” दरम्यान, या प्रकरणात बांगलादेशचे माजी गृहमंत्री यांच्याविरोधातही आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
अबू सय्यद प्रकरणात पोस्टमॉर्टम अहवाल बदलल्याचा दावा
न्यायाधीशांनी तपास अहवालातील आणखी एका गंभीर आरोपाचा उल्लेख केला. 16 जुलै 2024 रोजी पोलिसांच्या गोळीबारात विद्यार्थी नेता अबू सय्यदचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरात सुरू झालेल्या आंदोलनांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली. न्यायालयाने म्हटले की, शेख हसीना सरकारने अबू सय्यदच्या पोस्टमॉर्टम अहवालात 4 ते 5 वेळा फेरफार केला, डॉक्टरांना धमकावून त्यांच्या विरोधात गुप्तचर विभागाचे अहवाल असल्याचे सांगण्यात आले. शासनाविरुद्ध उठाव रोखण्यासाठी मृत्यूच्या कारणांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी शेख हसीना सरकार हटवण्याची जोरदार मागणी केली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.